TaTa Nexon Accident Video: पाचवेळा पलटी मारली, २०० फूट दरीत कोसळली; टाटाच्या कारमधील सारे वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 10:05 AM2022-01-30T10:05:19+5:302022-01-30T10:05:37+5:30
TaTa Nexon Accident Video Five Star Safety: सुरक्षिततेच्या बाबतीत या चांगल्या क्रमांकांसह, Tata Nexon ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड-इन-इंडिया कार म्हणून कायम आहे. अनेकदा या कारने सुरक्षा काय असते हे दाखवून दिले आहे.
टाटा कंपनीने भारतीयांना फाईव्ह स्टार सेफ्टी काय असते हे पहिल्यांदा दाखविले. अत्यंत सुरक्षित वाहने, कार बनवून जगालाही भारत फाईव्ह स्टार सेफ्टीची वाहने बनवू शकतो, याचा विश्वास दिला. ही तीच कार आहे, जिच्या लाँचिंगवेळी ग्लोबल एनकॅपचे सीईओ भारतात आले होते आणि मारुतीला आव्हान देऊन गेले होते. आजवर काही मारुतीला फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार बनविता आल्या नाहीत. पण टाटाने मात्र, तीन कार बनविल्या आहेत.
टाटाचा दणकटपणा दोन आठवड्यांपूर्वी दिसला. टाटा नेक्सॉनला हिमाचलप्रदेशमध्ये भीषण अपघात झाला. रस्त्यावरील ब्लॅक आईसवरून घसरल्याने नेक्सॉ़न २०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात नेक्स़ॉनने पाचवेळा पलटी खाल्ली. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यूट्यूबर निखिल राणा याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अपघातावेळी दोघेजण या कारमध्ये होते. दोघेही सुखरूप असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे या मोठ्या अपघातातून दोघेही सुखरूप बचावले आहेत. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार खेचून रस्त्यावर आणण्यात आली. या अपघातात कारलाही फारशी हानी झाली नाही आणि तिची फ्रेम जशीच्या तशीच राहिली, त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. Tata Nexon ही भारतातील पहिली कार आहे जिला ग्लोबल NCAP ने 5-स्टार सेफ्टी रेटिंग दिलेली आहे. सुरक्षिततेसाठी कारने 17 पैकी एकूण 16.7 गुण मिळवले आहेत.
सुरक्षिततेच्या बाबतीत या चांगल्या क्रमांकांसह, Tata Nexon ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड-इन-इंडिया कार म्हणून कायम आहे. या रेटिंगमध्ये SUV सह फुल-चॅनल ABS, दोन सामान्यतः आढळणाऱ्या एअरबॅग्ज आणि सीटबेल्ट रिमाइंडर सारखी वैशिष्ट्ये मोठी भूमिका बजावतात. ही अशी काही पहिलीच घटना नाही, याआधी टाटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या पंच मायक्रो एसयूव्ही कारचाही वेगात मोठा अपघात झाला होता. ज्यामध्ये टाटा पंचचे मोठे नुकसान होऊनही आत बसलेले प्रवासी सुरक्षित होते.