SUV खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! Nexon-Brezza सारख्या छोट्या एसयूव्ही होणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 07:22 PM2022-12-19T19:22:34+5:302022-12-19T19:23:29+5:30
Tata Nexon : विशेष बाब म्हणजे देशात विकल्या जाणाऱ्या अनेक एसयूव्ही कारचाही या यादीत समावेश आहे.
नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) बैठकीत अनेक वस्तूंसाठी जीएसटी दर 5 टक्के किंवा 0 पर्यंत कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे देशात विकल्या जाणाऱ्या अनेक एसयूव्ही कारचाही या यादीत समावेश आहे.
सध्या एसयूव्ही कारवर 20 ते 22 टक्के दराने कर आकारला जातो. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी एसयूव्ही कारची एक परिभाषा जारी केली आहे, जी देशभरात लागू होईल. ज्या कार या कक्षेत येत नाहीत, त्या कारवरील कर कमी करणे अपेक्षित आहे.
जीएसटी कौन्सिलनुसार, 1,500 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता, 4,000 मिमी लांबी आणि 170 मिमी पेक्षा जास्त ग्राउंड क्लीयरन्स असलेल्या एसयूव्ही म्हणून वर्गीकृत केल्या जातील. या कारवर 20-22 टक्के जीएसटी शिवाय उत्पादन शुल्क, व्हॅट, रोड टॅक्स, मोटार वाहन कर मिळून जवळपास 50 टक्के कर लागू होईल. मात्र, आता जे छोटी किंवा कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्या खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे.
Tata Nexon, Hyundai Venue, Kia Sonet, Maruti Suzuki Brezza आणि Mahindra XUV 300 सारख्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही आता अर्थमंत्र्यांनी दिलेल्या परिभाषेनुसार स्वस्त होऊ शकतात. यावर फक्त 5 टक्के जीएसटी कर लागू होऊ शकतो.
इंजिनपासून लांबीपर्यंत, सर्व काही लहान
दरम्यान, Maruti Suzuki Brezza बाबत सांगायचे झाल्यास, यामध्ये 1,462 सीसी पेट्रोल इंजिन मिळते आणि याची लांबी 3,995 मिमी आहे. तर ग्राउंड क्लीयरन्सच्या बाबतीत ते 200 मिमी आहे. त्याचप्रमाणे, Hyundai Venue मध्ये 1,493 सीसी डिझेल इंजिन आणि दोन पेट्रोल (998 सीसी आणि 1,197 सीसी) उपलब्ध आहेत. याची लांबी 3,995 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 190-195 मिमी आहे. तर Kia Sonet ला देखील Hyundai Venue प्रमाणेच लांबीचे समान इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत.
Tata Nexon आणि Mahindra XUV 300 बद्दल बोलायचे झाल्यास Nexon मध्ये 1,497 सीसी डिझेल आणि 1,199 सीसी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. त्याची लांबी 3,993mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 209mm आहे. त्याचप्रमाणे XUV300 मध्ये 1,497 सीसी डिझेल आणि 1,199cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत. याची लांबी 3,995 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे.