Auto Expo 2023: मारुती, ह्युंदाईची वाट लागणार; ऑटो एक्स्पोत टाटाच्या आणखी दोन सीएनजी कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:59 AM2023-01-12T08:59:01+5:302023-01-12T08:59:23+5:30
टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देखील सादर केले. ही इंजिन आगामी काळात टाटाच्या एसयूव्हीमध्ये दिसणार आहेत.
टाटा मोटर्सने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये धमाका सुरुच ठेवला आहे. नवीन ईलेक्ट्रीक एसयुव्ही दाखविताना सीएनजी वाहनांचा ताफा देखील वाढविण्यास सुरुवात केली आहे. टाटाने एक्स्पोमध्ये टाटा पंच सीएनजी आणि अल्ट्रॉझ सीएनजी प्रदर्शित केली. यामुळे येत्या काही महिन्यांत या कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत.
टाटाने ईलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये हॅरिअर ईव्ही, सिएरा ईव्ही, कर्व्ह ईव्ही आणि अविन्या ईव्ही या चार एसयुव्ही दाखविल्या आहेत. या चारही कार पाहून मारुतीसह अन्य कार कंपन्यांना धडकी भरली आहे.
टाटाच्या आणखी २ सीएनजी कार
टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देखील सादर केले. ही इंजिन आगामी काळात टाटाच्या एसयूव्हीमध्ये दिसणार आहेत. पंच आणि अल्ट्रॉझ सीएनजीत येत असल्याने टाटाच्या आता चार सीएनजी कार होणार आहेत. यामुळे मारुती, ह्युंदाई या सीएनजी कार देणाऱ्या कंपन्यांच्या काळजात धस्स झाले आहे. त्यांच्या कारना या कार टक्कर देणार आहेत.
टाटा मोटर्स आगामी काळात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त कार लाँच करणार आहे. टाटा मोटर्सने यावर्षी हॅरियर ईव्ही आणि सिएरा ईव्हीच्या संकल्पना मांडल्या आहेत. येत्या २-३ वर्षांत या सर्व इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर दिसणार आहेत. लूक आणि फीचर्स तसेच बॅटरी रेंज आणि स्पीडच्या बाबतीत या गाड्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुरेशा देण्यात येतील.