Tata Punch EMI: टाटा पंचसाठी २० टक्के डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI; जाणून घ्या गणित...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 10:29 AM2022-11-04T10:29:55+5:302022-11-04T10:30:14+5:30
वर्षभरात या कारने जवळपास १.१८ लाखांचा टप्पा पार केला आणि ऑटोमोबाईल विश्वात टाटाचा बोलबाला सुरु झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर १२ हजार युनिटपेक्षा जास्त खप नोंदविला. यामुळे ही कार टाटाची बेस्ट सेलिंग कार बनली आहे.
टाटा मोटर्सला नेक्सॉननंतर टाटा पंच या छोट्याशा कारने मोठे यश मिळवून दिले आहे. ही मिनी एसयुव्ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आली होती. पहिल्याच महिन्यात या कारची विक्री 8,453 युनिट एवढी झाली होती. वर्षभरात या कारने जवळपास १.१८ लाखांचा टप्पा पार केला आणि ऑटोमोबाईल विश्वात टाटाचा बोलबाला सुरु झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर १२ हजार युनिटपेक्षा जास्त खप नोंदविला. यामुळे ही कार टाटाची बेस्ट सेलिंग कार बनली आहे.
टाटाच्या या कारच्या बेस व्हेरिअंटची किंमत 5,92,900 रुपयांपासून सुरु होते, तर टॉपचा काझिरंगा IRA ची किंमत 9,48,900 रुपये आहे. या कारला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. ही कार घ्यायची असेल तर बजेटमध्ये देखील आहे. तुम्ही २० टक्के डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला किती ईएमआय बसेल, याचे गणित जाणून घेऊया...
बँक ऑफ बडोदा ऑटो लोनवर ७ टक्के व्याज आकारते. यासाठी १५०० रुपये प्रोसेसिंग फी घेते. एसबीआय ७.२० टक्के व्याज आकारते. अन्य बँकांचे व्याज ९ ते १० टक्क्यांवर जाते. हे व्याज ५ ते ७ वर्षांसाठी आकारले जाते. जर तुम्ही २० टक्के डाऊनपेमेंट केले तर उरलेल्या रकमेचे तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता. ७ वर्षांसाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता.
पंचच्या बेस व्हेरिअंटची किंमत 5,92,900 रुपये आहे. २० टक्के डाऊनपेमेंट 1,18,580 रुपये होते. एवढे पैसे दिल्यानंतर ८ टक्के व्याजदराने 4,74,320 रुपयांचे लोन घेतले तर तुम्हाला दर महिन्याला 7,393 रुपये ईएमआय पडेल. एकूण कर्जावर तुम्हाला 1,46,680 रुपयांचे व्याज मोजावे लागणार आहे.
पंचचे टॉप व्हेरिअंट काझीरंगाची किंमत 9,48,900 रुपये आहे. 1,89,780 रुपये डाऊनपेमेंट केल्यास 7,59,120 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. यामुळे ७ वर्षंसाठी तुम्हाला 11,832 रुपयांचा ईएमआय बसतो. 2,34,752 रुपये तुम्हाला व्याज द्यावे लागेल. टाटा पंच मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 18.97 kmpl आणि ऑटोमॅटिकमध्ये 18.82 kmpl मायलेज देते.