टाटाच्या या एसयुव्हीने तब्बल 25 वर्षे भारतीय रस्त्यांवर राज्य केले...आता उत्पादन बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:30 PM2019-09-17T12:30:25+5:302019-09-17T12:31:16+5:30
टाटाने 1994 मध्ये पहिली एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर उतरवली होती.
मुंबई : देशात वाहन क्षेत्र मंदीने ग्रासलेले आहे. नव्या अद्ययावत वाहनांची विक्रीही थंडावलेली आहे. केंद्र सरकारने यामागे वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. यापैकीच एक असलेले बीएस 6 नियमावली आहे. यामुळे मारुतीनेही जिप्सी, ओम्नीसारखी वाहने बंद केली आहेत. आता टाटानेही गेल्या 25 वर्षांपासून सामान्यांपर्यंत पोहोचलेली एसयुव्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटाने 1994 मध्ये पहिली एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर उतरवली होती. ती म्हणजे टाटा सुमो. मात्र, काळाप्रमाणे बदल करण्यात टाटाला अपयश आले. टाटाने सुमोची ग्रँडे हे मॉडेल काढले खरे परंतू ते लोकांना भावले नाही. यामुळे सुमोचे मॉडेल टाटाला सुरू ठेवावे लागले. ग्रामीण भागात सुमोने चांगला जम बसविला होता. आजच्या काळातील स्टायलिश एसयुव्हींमुळे सुमो खूप मागे पडली. आता टाटाने ही सुमो बंद केली आहे. दिल्लीच्या डिलरने ही माहिती दिली आहे.
येत्या 1 एप्रिलपासून वाहन क्षेत्र कात टाकणार आहे. सुरक्षेचे, पर्यावरणाचे नवीन नियम लागू होत आहेत. बीएस 6 नुसार सुरक्षा आणि इंधनापासून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इंजिनामध्ये बदल करावे लागणार आहेत. दोन वर्षांपूर्वीच कंपन्यांना बीएस 4 प्रणाली वापरावी लागली होती. यामुळे कंपन्यांचा उत्पादन आणि संशोधन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे टाटा मोटर्सने सुमोच्या इंजिनामध्ये काही बदल केलेले नाहीत. त्यापेक्षा नवीन कार लाँच करण्याकडे कंपनीचा कल आहे. टाटा हॅरिअर, नेक्सॉन, अल्ट्रूझ अशा कार टाटा लाँच करत आहे. यामुळे टाटा सुमोला सुरू ठेवण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसत आहे.
सुमोनंतर टाटाची सफारीचाही नंबर लागण्याची शक्यता आहे. सफारीलाही बाजारात मागणी नाही. यामुळे या एक्सयुव्हीला एकतर मॉडिफाय करावे लागेल किंवा बंद करावी लागणार आहे. टाटाची एक्सयुव्हीमध्ये हेक्साही आहे.