देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जमध्ये ३०६ किमी धावणार, वर्षाला २ लाख वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:53 PM2022-05-11T19:53:28+5:302022-05-11T19:55:40+5:30
एका चार्जमध्ये ३०० किमीहून अधिक धावणारी कार; ५ वर्षांत १० लाख रुपये वाचणार
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती पाहून अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. मात्र इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत. दुसरीकडे इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत असे प्रकार फारसे घडलेले नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिक कार सुरक्षित मानल्या जात आहेत.
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारचा विचार केल्यास त्यात टाटा टिगॉर ईव्ही पहिल्या क्रमांकावर आहे. ही कार ७४.७ पीसीची पॉवर आणि १७० एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये मल्टी ड्राईव्ह आणि स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. कारच्या बॅटरीची क्षमता २६ kWh आहे. ही कार अवघ्या ५.७ सेकंदांत ० ते ६० किमी प्रतितास वेग गाठते.
फास्ट चार्जिंगच्या सुविधेमुळे टाटा टिगॉर ईव्ही १ तास ५ मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होते. तर नॉर्मल चार्जिंगचा वापर केल्यास कार पूर्ण चार्ज होण्यास ८ तास ४५ मिनिटं लागतात. कार पूर्ण झाल्यावर ती ३०६ किमी अंतर कापते. कंपनीनं कारच्या बॅटरी आणि मोटरवर ८ वर्षे किंवा १.६ लाख किमीची वॉरंटी दिली आहे. GNCAP नं सेफ्टीमध्ये कारला ४ स्टार दिले आहेत. त्यामुळे कार सुरक्षित आहे. Tata Tigor EV XE व्हेरिएंटची किंमत १२ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे.
कंपनीनं कारसोबत काही महत्त्वाची माहिती आणि आकडेवारी दिली आहे. एखादी व्यक्ती या कारच्या वापरातून १० लाख ७ हजार २० रुपये वाचवू शकते असा कंपनीचा दावा आहे. एखादी व्यक्ती या कारनं दिवसाला १०० किमी प्रवास करत असल्यास आणि पेट्रोलची किंमत १०५.४१ लीटर (दिल्लीतील दर) असल्याचं लक्षात घेतल्यास वर्षाकाठी त्याची बचत २ लाख १ हजार ४०४ रुपये असेल, असा कंपनीचा दावा आहे.