Tata लवकरच वाढवणार कारच्या किंमती, सध्या मिळतोय बम्पर डिस्काउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 05:36 PM2022-11-07T17:36:12+5:302022-11-07T17:37:17+5:30
Tata Cars Price Hike: या महिन्यात कंपनी आपल्या Tiago, Tigor, Harrier आणि Safari या चार लोकप्रिय कारवर 65,000 रुपयांपर्यंतची ऑफर देत आहे.
टाटा कंपनीच्या कार आणि एसयूव्हीच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होणार आहे. टाटा या वर्षी चौथ्यांदा आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने आपल्या सर्व पेसेंजर वाहनांच्या किमती 0.9 टक्क्यांनी वाढविण्याची घोषणा केली आहे. नव्या किमती 9 नोव्हेंबर 2022 पासून लागू होतील. पूर्वी प्रमाणेच यावेळीही किंमत वाढीमागील कारण इनपुट कॉस्ट असल्याचे सांगितले जात आहे. किमतीतील ही वाढ मॉडेल आणि व्हेरिअंटनुसार वेगवेगळी असेल. सध्या टाटा मोटर्सच्या भारतातील प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये दहा मॉडेल्स आहेत. यांत टियागो, टियागो ईव्ही, टिगोर, टिगोर ईव्ही, अल्ट्रोज, पंच, नेक्सन, नेक्सन ईव्ही, हॅरियर आणि सफारीचा समावेश आहे.
या महिन्यात कंपनी आपल्या Tiago, Tigor, Harrier आणि Safari या चार लोकप्रिय कारवर 65,000 रुपयांपर्यंतची ऑफर देत आहे. टाटा हॅरियरवर 65,000 रुपयांपर्यंतचे सर्वाधिक बेनिफिट्स ऑफर केले जात आहेत. यात 30000 रुपयांपर्यंतची रोख सूट, 30000 रुपयांपर्यंत एक्सचेन्ज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. तसेच हॅरियर काझीरंगा आणि जेट अॅडिशनवर 30,000 रुपयांपर्यंतची रोख सूट दिली जात आहे. तसेच इतर व्हेरिअंटवर 20,000 रुपयांपर्यंतची रोख सूट दिली जात आहे.
याच बरोबर, टाटा सफारी काझीरंगा आणि जेट अॅडिशनवर 30,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. एसयूव्हीच्या इतर सर्व व्हेरिअंटवर 20,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. याशिवाय खरेदी करणाऱ्यांना 30,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस लाभही घेता येईल. टाटा टिगोर सेडानवर 38,000 रुपयांपर्यंतची ऑफर्स आहे. यात 20,000 रुपयांपर्यंतची रोष सूट, 15000 रुपये एक्सचेन्ज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ समाविष्ट आहे. Tigor CNG वर 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे.
टाटाच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक टिगोरवर 33,000 रुपयांपर्यंतची ऑफर आहे. हिच्या सर्व व्हेरिअंट्सवर 20,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस मिळत आहे. याशिवाय या कारवर 3,000 रुपयांचा कॉरपोरेट डिस्काउंट देखील मिळत आहे.