टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:40 PM2024-11-06T18:40:19+5:302024-11-06T18:40:38+5:30
ब्रिटीश मीडियामध्ये नोव्हेंबरपासून जग्वारने कारची विक्री बंद केल्याचे म्हटले आहे.
टाटा मोटर्सला मोठा झटका बसू लागला आहे. चीनसह जगाची अर्थव्यवस्था मंदावल्याने टाटा मोटर्ससह, जग्वार सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या कारची मागणी कमालीची घटली आहे. यामुळे टाटाचे शेअर्सही कमालीचे घसरले आहेत. अशातच ब्रिटनमधून मोठी घडामोड समोर येत आहे. जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली आहे.
टाटाच्या मालकीच्या जग्वार ब्रँडने ब्रिटनमध्ये नवीन मॉडेल्स विकणे थांबविले आहे. यामागचे कारण कंपनीने इलेक्ट्रीक कारकडे वळत असल्याचे सांगितले आहे. जग्वार आता पूर्णपणे इलेक्ट्रीक कारकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. हा बदल होईपर्यंत म्हणजेच जवळपास २०२६ पर्यंत कंपनी एकही पेट्रोल, डिझेलवर चालणारी कार बनविणार नाही. याचा अर्थ जग्वार २०२६ पर्यंत एकही कार विकणार नाहीय. इलेक्ट्रीक रणनितीचा हा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीने हा निर्णय ब्रिटनपुरताच घेतला असून अन्य बाजारांत जग्वार इंधनावरील कार विकणे सुरुच ठेवणार आहे. जग्वार हा ब्रँड ब्रिटनचा आहे. टाटांनी तो डबघाईला आलेला असताना विकत घेतला होता. आता जग्वारने २०२५ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रीक होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अद्याप कंपनीने कोणत्याही ईलेक्ट्रीक वाहनाचा खुलासा केलेला नसला तरी भारतात टाटाने अनेक कार इलेक्ट्रीक केल्या आहेत.
जग्वारने आपल्या वेबसाईटरील यादीतून XE, XF, E-Pace, F-Type ही नावे हटविली आहेत. आता कंपनीने F-Pace हे नावही हटविले आहे. ब्रिटीश मीडियामध्ये नोव्हेंबरपासून जग्वारने कारची विक्री बंद केल्याचे म्हटले आहे.