Tesla ची भारतात एंट्री होऊ शकते, पण 'ही' अट आधी करावी लागेल पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 04:13 PM2022-06-19T16:13:33+5:302022-06-19T16:14:20+5:30
Tesla : गेल्या महिन्यात एलन मस्क म्हणाले होते की, टेस्ला भारतात स्थानिक पातळीवर ईव्हीचे उत्पादन करणार नाही, जोपर्यंत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना भारतात विक्री आणि सर्व्हिस करण्याची परवानगी दिली जात नाही.
नवी दिल्ली : टेस्ला (Tesla) आणि कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांचे भारतात स्वागत आहे. मात्र, आत्मनिर्भर भारताच्या धोरणापासून सरकार कोणत्याही प्रकारे मागे हटणार नाही. भारतात आपली उत्पादने विकण्यापूर्वी कंपनीला ही अट मान्य करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, टेस्ला देशात आपली इलेक्ट्रिक वाहने विकण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे. गेल्या महिन्यात एलन मस्क म्हणाले होते की, टेस्ला भारतात स्थानिक पातळीवर ईव्हीचे उत्पादन करणार नाही, जोपर्यंत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना भारतात विक्री आणि सर्व्हिस करण्याची परवानगी दिली जात नाही.
भारतातील वाहनांच्या उत्पादन योजनांबद्दल विचारले असता एलन मस्क यांनी ट्विटरवर ही माहिती शेअर केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आम्हाला आधी विक्री करण्याची परवानगी नसलेल्या कोणत्याही ठिकाणी टेस्ला उत्पादन प्रकल्प उभारणार नाही". दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका शिखर परिषदेत अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री पांडे म्हणाले की, देशाचे आत्मनिर्भर धोरण कायम आहे. टेस्लाचे भारतात स्वागत आहे, पण कंपनीला देशाच्या धोरणांचे पालन करावे लागेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाला भारतात इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्यासाठी निमंत्रित केले होते. कोणत्याही कर कपातीची अपेक्षा करण्यापूर्वी टेस्लाला देशासाठी त्याच्या उत्पादन योजना शेअर करण्यास सांगितले होते. नितीन गडकरी म्हणाले होते की, 'एलन मस्क भारतात टेस्ला बनवण्यास तयार असेल तर काही हरकत नाही. आमच्याकडे सर्व पात्रता आहे, विक्रेते उपलब्ध आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळे ते खर्च कमी करू शकतात.'
दोन वर्षांपूर्वी भारतात नोंदणी झाली होती
नितीन गडकरी असेही म्हणाले होते की, टेस्लाला चीनमध्ये आपल्या ईव्हीचे उत्पादन करण्यास सांगणे आणि नंतर ते भारतात विकणे, हे कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही, कारण देशासाठी असा प्रस्ताव चांगला नाही. आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी भारतात येऊन येथे वाहनांची निर्मिती करावी करावे. दरम्यान, 2020 मध्ये टेस्लाने भारतात Tesla India Motors & Energy Pvt Ltd नावाच्या उपकंपनीद्वारे औपचारिकपणे नोंदणी केली होती.