करच जोडले! टेस्ला 'चोरट्या' मार्गाने कर्नाटकात; म्हणे अमेरिकेची कंपनी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 03:00 PM2021-01-19T15:00:36+5:302021-01-19T15:01:30+5:30
Tesla, Elon musk news: टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी करचोरीचा चोरटा मार्ग पकडत भारतात एन्ट्री केली आहे. खरेतर टेस्ला मोटर्स ही कंपनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये रजिस्टर आहे. टेस्लाने भारतात तिची सहकारी कंपनी टेस्ला मोटर्स अँड एनर्जी, इंडिया नावाने नोंद केली आहे.
जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्लाने (Tesla) भारतात एन्ट्री करत मोठी खळबळ उडवून दिली होती. महाराष्ट्रात येणार असे म्हणत असतानाच टेस्लाने थेट कर्नाटकात पाऊल ठेवल्याने राज्यातील राजकारणातही काहीशी अस्वस्थता निर्माण केली होती. एक मोठी कंपनी हातची गेली, अशी भावना विरोधकांमध्ये झाली होती. आता टेस्लाचे भारत प्रवेशाचे एकेक प्रताप समोर येत आहेत.
टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी करचोरीचा चोरटा मार्ग पकडत भारतात एन्ट्री केली आहे. खरेतर टेस्ला मोटर्स ही कंपनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये रजिस्टर आहे. टेस्लाने भारतात तिची सहकारी कंपनी टेस्ला मोटर्स अँड एनर्जी, इंडिया नावाने नोंद केली आहे. भारतात रजिस्टर केलेल्या कंपनीची पेरेंट कंपनी ही टेस्ला मोटर्स एमस्टरडॅम आहे आणि ही कंपनी नेदरलँडध्ये आहे. नेदरलँड म्हणजे टॅक्स हेवन देश. कंपन्यांसाठी करचोरीचा खुश्कीचा मार्ग. असे करण्यामागे एलन मस्क यांचे कार्पोरेट डोके आहे. भारतात व्यवसाय सुरु करण्याआधीच त्यांनी कर कसा वाचवायचा याचे उदाहरण दिले आहे.
भारताचे जे कार्पोरेट स्ट्रक्चर आहे, त्यामुळे टेस्लाला नेदरलँडमार्गे येण्याचा रस्ता सापडला आहे. याद्वारे टेस्ला कॅपिटल गेन आणि डिव्हिडंटवर कर माफी मिळवू शकणार आहेत. अधिकतर अमेरिकी कंपन्या या नेदरलँडमार्गेच भारतात येतात. कारण नेदरलँडचा कर कमी आहे तसेच बौद्धिक संपदेचे कायदे खूप कडक आहेत. यामुळे कंपन्यांना पेटंटमध्ये संरक्षण मिळते ते वेगळेच.
मॉरीशस, सिंगापूरसोबत भारताने कर समझोत्यांमध्ये बदल केले आहेत. यामुळे तेथून एफडीआयवर कॅपिटल गेनमध्ये सूट मिळण्याचे मार्ग बंद झाले आहेत. मात्र, नेदरलँड आणि भारतामध्ये कर समझोत्यांमध्ये तशी तरतूद आहे. कोणतीही डच कंपनी जर भारतीय शेअर कोणत्याही गैर भारतीय कंपनीला विकत असेल तर कॅपिटल गेन करामध्ये सूट मिळते. याशिवाय एखादा गुंतवणूकदार जर नेदरलँड मार्गे येत असेल तर त्याला डिव्हिडंट आणि विथहोल्डिंग कर कमी आकारला जातो. यामुळेच टेस्लाने अमेरिकेतून न येता नेदरलँडचा खुश्कीचा मार्ग पकडला आहे.