टेस्ला गुजरातमध्ये की अन्य कुठे? व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला मस्क येणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:55 PM2024-01-11T15:55:50+5:302024-01-11T15:56:09+5:30
गुजरातमध्ये टेस्ला कारची उत्पादन फक्टरी उभारली जाणार आहे, असे वृत्त होते, परंतु मस्क हे या कार्यक्रमालाच येणार नसल्याचे समोर येत आहे.
ईलेक्ट्रीक कार कंपनी टेस्लागुजरातमध्ये प्रकल्प उभारणार असल्याच्या चर्चा सुरु होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत खुद्द एलन मस्क यांनीच तशी घोषणा केली होती. सध्या सुरु असलेल्या व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात मस्क याची घोषणा करतील असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, आता याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. मस्क व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये येणार नसल्याचे समोर येत आहे.
गुजरात इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉरपोरेशनचे संचालक राहुल गुप्ता यांनी बुधवारी सांगितले की, कोणतीही कंपनी कुठे गुंतवणूक करेल हे ठरविणे त्या कंपनीचा विशेष अधिकार आहे. गुजरात सरकार त्यांना सुविधा देऊन खुश असेल.
यापूर्वी असे वृत्त होते की गुजरातमध्ये टेस्ला कारची उत्पादन फक्टरी उभारली जाणार आहे. गुजरात आताही इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात एक चांगला पर्याय असेल. यामुळे अधिकतर गुंतवणूकदार गुजरातच्या वाटेवर असल्याचे गुप्ता म्हणाले.
जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असताना मस्क यांच्या कंपनीने गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून टेस्लाच्या भारतात प्रवेशाबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मस्क भारतात $2 अब्ज गुंतवणूक करू शकतात, असे सांगितले जात होते. भारतीयांना टेस्ला खूपच स्वस्त दरात मिळू शकेल कारण ते पहिल्या दोन वर्षांत कारवरील 15 ते 20% आयात कर वाचवू शकतील, असे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी म्हटले आहे.