टेस्लाच्या सायबर ट्रकला गंजही लागू लागला; ग्राहक वैतागले, कंपनी म्हणतेय १ महिना लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 03:15 PM2024-02-19T15:15:06+5:302024-02-19T15:15:22+5:30
टेस्लाचा हा सायबरट्रक बुलेटप्रूफ आहे. त्याची ताकद एखादा मोठा ट्रक देखील ओढू शकण्याएवढी आहे. त्याला अॅक्सेसरीज लावल्य़ा तर तो पाण्यावरही चालविता येतो.
नवीन गाडी घेतली आणि तिला गंज लागू लागला तर कसे वाटते... हे प्रकार भारतातही होतात, नाही असे नाही. परंतु करोडोंच्या कारलाच गंज लागू लागला तर... नुकत्याच लाँच झालेल्या टेस्लाच्या सायबर ट्रकला गंज चढू लागला आहे.
टेस्लाचा हा सायबरट्रक बुलेटप्रूफ आहे. त्याची ताकद एखादा मोठा ट्रक देखील ओढू शकण्याएवढी आहे. त्याला अॅक्सेसरीज लावल्य़ा तर तो पाण्यावरही चालविता येतो. अशा वेगवेगळ्या फिचर्सनी युक्त हा इलेक्ट्रीक ट्रक गंजू लगाला आहे. अनेक ग्राहकांकडून याची तक्रार येवू लागली आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये या सायबरट्रकची डिलिव्हरी कंपनीने सुरु केली होती. या ट्रकची किंमत ६६ लाख रुपयांपासून सुरु होते. काही मालकांनी त्यांच्या या ट्रकवरील चमक कमी होऊ लागल्याची तक्रार केली आहे. तसेच स्टेनलेस स्टीलच्या बॉडीला गंज लागू लागल्याचा दावा केला आहे.
टेस्लाने याबाबत काही प्रतिक्रिया दिलेली नाहीय. cybertruckownersclub.com या फोरमवर ग्राहक तक्रार करू लागले आहेत. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर टेस्लाच्या या ट्रकच्या बाहेरील बॉडीवर गंज दिसू लागल्याचे एका ग्राहकाने म्हटले आहे. एका ग्राहकाने यासाठी टेस्लाच्या सर्व्हिस सेंटरला फोन केला तेव्हा दुरुस्तीसाठी एक महिन्याची वाट पहावी लागेल असे म्हटले आहे.