जागाच जागा! १३ सीटर Force Gurkha चा लूक लीक; कमाल डिझाइन अन् धाकड पावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 05:06 PM2022-08-08T17:06:22+5:302022-08-08T17:06:51+5:30
फोर्स मोटर्स कंपनी सध्या आपल्या फोर्स गुरखाच्या नव्या मॉडेलवर काम करत आहे. सध्या गुरखा फक्त 3 डोअर मॉडेलमध्येच उपलब्ध आहे,
फोर्स मोटर्स कंपनी सध्या आपल्या फोर्स गुरखाच्या नव्या मॉडेलवर काम करत आहे. सध्या गुरखा फक्त 3 डोअर मॉडेलमध्येच उपलब्ध आहे, पण पुण्यात गुरखाचं नवं व्हर्जन पाहायला मिळालं आहे. गुरखाचं नवं मॉडेल ट्रॅक्स क्रूझरसारखेच असणार आहे. हे नवं मॉडेल पाहता हे लाँग व्हील बेस व्हर्जनवर उपलब्ध होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या नवीन व्हर्जनचा व्हील बेस आधीच्या व्हर्जनपेक्षा मोठा आहे.
समोरून पाहिल्यास, ही नवी फाइव्ह डोअर गुरखा जुन्या थ्री डोअरसारखीच दिसते. नवी कार स्नॉर्कल, विंडस्क्रीन बार, रुफ रेल आणि मागील शिडीनं सुसज्ज आहे.
१३ लोक करु शकतील प्रवास
टीम बीचएपीच्या रिपोर्टनुसार, या नवीन गुरखामध्ये १३ लोक एकत्र प्रवास करू शकतात. सीटबद्दल बोलायचं झाल्यास कारच्या रिअर सीट्समध्ये कॅप्टन सीट असण्याऐवजी त्यास बेंच सीटनं बदलण्यात आलं आहे. तर मागील भागात २ बाजूच्या बेंच सीट देण्यात आल्या आहेत.
२.६ लीटर डिझेल इंजिन
टीम बीएचपीने आपल्या रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार यात २.६ लीटर डिझेल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे ९० एचपी पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 4 व्हील ड्राइव्हचा पर्याय देखील असू शकतो.
महिंद्राच्या थारची थेट स्पर्धा
फोर्स गुरखा कारची स्पर्धा महिंद्रा थार ऑफ रोड कारशी आहे. महिंद्रा थार बद्दल आज नवीन माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये पुढील वर्षीच्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये महिंद्रा थार फाइव्ह डोअर व्हर्जन सादर करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार नव्या गुरखा कारमध्ये १३ लोक बसू शकतील. मात्र, त्यामध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये असतील, त्यासाठी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.