जग ईव्हीकडे चाललेय, पण मारुती वेगळ्याच मुडमध्ये; या तीन इंधनांकडे लक्ष द्यायचे म्हणतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 07:15 PM2023-09-30T19:15:41+5:302023-09-30T19:15:59+5:30
मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे.
ईलेक्ट्रीक कारच्या क्षेत्रात टाटाने भक्कम पाय रोवल्यानंतरही मारुती तिकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. सर्व कंपन्या ईलेक्ट्रीक कारकडे वळत असताना मारुती वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे. भारत सोडून गेलेल्या फोर्डने देखील तिकडे अमेरिकेत इलेक्ट्रीक प्रकल्पांचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. असे असताना भारतातील मारुती आणि अमेरिकेतील फोर्ड या दोन देशांतील सर्वात मोठ्या कंपन्या ईलेक्ट्रीककडे का जात नाहीएत असा प्रश्न पडू लागला आहे.
मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे. जोपर्यंत भारतात ५० टक्के वीज ही अक्षय उर्जा स्रोतांपासून तयार होत नाही तोवर ईलेक्ट्रीक कार कधीही पर्यावरणपूरक ठरू शकणार नाहीत असे म्हटले आहे. काही अंशी त्यांचे बरोबरही आहे. आजही मोठ्या प्रमाणावर वीज ही कोळशापासून बनविली जात आहे. काही ठिकाणी तर ईव्ही चार्जिंग स्टेशन डिझेल जाळून जनरेटरवर चालविली जात आहेत.
यामुळे भार्गव यांनी सीएनजी, इथेनॉल आणि हायड्रोजन यासारख्या हरित इंधनावर लक्ष केंद्रीत करायला हवे असा प्रस्ताव मांडला आहे. देशाची 75% वीज कोळशापासून तयार केली जाते. हीच वीज आपण इलेक्ट्रीक कार चार्ज करण्यासाठी वापरतो. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीच्या स्वच्छ ज्वलनामुळे सीएनजी वाहनांकडे जाणे देखील अधिक टिकाऊ पर्याय असेल, असे ते म्हणाले आहेत. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने आयोजित केलेल्या 50 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यामुळे भविष्यात मारुती तरी ईलेक्ट्रीक कार मोठ्या प्रमाणावर आणि लवकर आणण्याची शक्यता कमी दिसत आहे. मारुतीला इलेक्ट्रिक वाहन बाजारात येण्यास खूपच विलंब होत आहे. कंपनीने वॅगन आरची इलेक्ट्रिक आवृत्ती विकसित केली आहे, असेही भार्गव यांनी म्हटले आहे. परंतू, उच्च किंमतीमुळे त्याच्या बाजारपेठेतील व्यवहार्यतेला अडथळा निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.