महाराष्ट्रात उभी राहणार ५०० इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 05:07 AM2020-03-01T05:07:19+5:302020-03-01T05:08:32+5:30
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे, प्रदूषण कमी व्हावे, म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करणारे १ हजार चार्जिंग स्टेशन देशभरात उभारण्यात येणार
सचिन लुंगसे
मुंबई : पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे, प्रदूषण कमी व्हावे, म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करणारे १ हजार चार्जिंग स्टेशन देशभरात उभारण्यात येणार असून, या १ हजार चार्जिंग स्टेशन्सपैकी ५० टक्के म्हणजे ५०० चार्जिंग स्टेशन्स महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांत उभारण्यात येतील.
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील चार सार्वजनिक कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीने भारतात ई-मोबिलिटीला चालना देण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या केंद्र सरकारच्या मालकीच्या दूरसंचार कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्राचा विचार करता, महाराष्ट्रात कुठे स्टेशन्स उभारण्यात येतील, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या परिसरांची निवड झाली की, त्यानंतर वेगाने काम हाती घेतले जाईल. मुंबईत एमटीएनएलच्या सहकार्याने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी काम केले जाईल. या व्यतिरिक्त मुंबई महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या प्राधिकरणांचीही मदत घेतली जाईल. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे हा यामागचा हेतू आहे.
मुंबईत बीएसएनएलच्या ज्या जागा वापरात नाहीत, तेथे स्टेशन्स उभारले जातील. आजघडीला इलेक्ट्रिक वाहनांची संख्या कमी आहे. परिणामी, चार्जिंग स्टेशन्सही कमी आहेत. चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढली की, साहजिकच इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही वाढेल.
>सामंजस्य करार
ईईएसएलने आजवर देशभरात ३०० एसी आणि १७० डीसी चार्जर्स कार्यान्वित केले आहेत. दिल्ली एनसीआर प्रदेशात ६६ सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. अहमदाबाद महानगरपालिका (एएमसी), नॉयडा प्राधिकरण, चेन्नई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (सीएमआरसीएल), जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जेएमआरसीएल), ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएसएमसी) आणि आयुक्त, महापालिका प्रशासन संचालक (सीडीएमए), न्यू टाउन कोलकाता डेव्हलपमेंट आॅथॉरिटी आणि कलिंगा विद्यापीठ रायपूर (छत्तीसगड) यांच्याशी संबंधित परिसरामध्ये सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
- सौरभ कुमार, व्यवस्थापकीय संचालक, ईईएसएल