स्कूटर अपघातात अल्पवयीनांचा मृत्यू; पालक, वाहन मालकावर गुन्हा दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 03:50 PM2019-12-02T15:50:19+5:302019-12-02T15:51:33+5:30
दिल्लीमध्ये अल्पवयीनांच्या अपघाती मृत्यूमध्ये वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली गेटच्या बाजुला स्कूटर अपघातात तीन अल्पवयीनांचा मृत्यू झाला आहे. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता स्कूटरच्या मालकावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच मुलांच्या पालकांवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही स्कूटर मृताच्या काकांची होती.
दिल्लीमध्ये अल्पवयीनांच्या अपघाती मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. 2018 मध्ये अल्पवयीनांच्या मृत्यूचा आकडा 2015 च्या तुलनेत सहा पटींनी वाढला आहे. 2015 मध्ये 225 पावत्या फाडण्यात आल्या होत्या. तर 2018 मध्ये 1228 आणि 2017 मध्ये 1067 एवढ्या पावत्या फाडण्य़ात आल्या आहेत.
निसान इंडिया आणि रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या एनजीओ सेव्ह लाईफ फाऊंडेशननुसार अल्पवयीन चालकांवर एक सर्वेक्षण केले होते. यानुसार पकडले गेलेल्या चालकांपैकी 96.4 टक्क्यांनी सांगितले की त्यांच्या पालकांना ते वाहन चालवत असल्याचे माहिती असते. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये पकडण्यात आलेल्या अल्पवयीन चालकांपैकी 33.2 टक्के चालक मोटारसायकल चालवत होते. तर वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या वर्षी 914 गुन्हे रात्री उशिरा झाले होते.
यंदा 383 मोटारसायकल स्वारांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा 464 होता. यंदा दिल्ली पोलिसांनी 1.57 लाख मोटारसायकल स्वारांना ट्रिपल सीट पकडले होते. तर 9.5 लाख लोकांना हेल्मेट नसल्याचा दंड करण्यात आला होता. शनिवारच्या अपघातात एकाही मुलाने हेल्मेट घातले नव्हते.