प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कारच्या मागच्या सीटवर होणार मोठा बदल; सरकार घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:45 PM2022-02-08T12:45:11+5:302022-02-08T12:46:38+5:30
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय येत्या एक महिन्यात अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे,
नवी दिल्ली – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार लवकरच कार उत्पादक कंपन्यांना सर्व सीटवर थ्री-पॉइंट सीटबेल्ट देणं बंधनकारक करणार आहे. ज्यात मागील सीटवर बसलेल्या सर्व प्रवाशांचा समावेश आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे. सध्या देशात बनत असलेल्या कारमध्ये फक्त पुढील आणि मागच्या दोन सीट्स थ्री पॉइंट सीटबेल्ट उपलब्ध आहे. ज्याला वाय आकार बेल्ट म्हणून ओळखलं जातं. या कारमध्ये फक्त दोन-पॉइंट किंवा मागील सीटवर लॅप सीटबेल्ट असतात, जसे की विमानाच्या आसनांमध्ये पोटाच्या वरुन बेल्ट असतो.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय येत्या एक महिन्यात अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे, त्यानंतर लोकांकडून सूचना मागवल्या जातील. मंत्रालयाच्या विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, भारतात उत्पादित प्रवासी कारचे सुरक्षा रेटिंग सुधारण्याचा सरकारचा मानस आहे. काही मॉडेल्स सोडून भारतात कुठल्याही वाहनांमध्ये मागील सीटवर थ्री प्वाइंट सीटबेल्ट नाही. केवळ एक लॅप बेल्ट आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक असल्याचं आमच्या निदर्शनास आलं
थ्री पॉइंट सीट बेल्टचे फायदे
थ्री-पॉइंट सीटबेल्ट हे दोन-पॉइंट बेल्टपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे कारण ते अपघातावेळी छाती, खांदे आणि शरीराची उर्जा अधिक समान रीतीने पसरवते ज्यामुळे कमी जोखीम होते.
लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, ऑटोमेकर व्हॉल्वोने तीन-पॉइंट सीटबेल्ट विकसित केले आणि ऑगस्ट १९५९ मध्ये त्यांच्या कारमध्ये पेटंट केलेले सीटबेल्ट सादर केले. मात्र, सार्वजनिक सुरक्षेच्या हितासाठी कंपनीने पेटंट मागे घेतले.
१ ऑक्टोबरपासून कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य
मंत्रालयाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व प्रवासी वाहनांसाठी सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या सरकारने नुकत्याच केलेल्या निर्णयानंतर लोकांसाठी कार सुरक्षित बनवण्याचे हे दुसरे पाऊल असेल. सध्या, भारतातील कारचे सरासरी वाहन रेटिंग तुलनेने खराब आहे आणि बहुतेक मॉडेल्सना सुरक्षा मानकांनुसार 3-स्टार किंवा त्यापेक्षा कमी रेट केले जाते. १४ जानेवारी रोजी परिवहन मंत्रालयाने एक मसुदा अधिसूचना जारी करून सहा एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत लोकांचे मत मागवले होते, ज्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, ३० टक्क्यांहून अधिक अपघातांमध्ये मागील सीटबेल्ट न लावल्यामुळे प्रवाशांना दुखापत झाली आहे.