झुक झुक गाडी आता झुकणार; वळणावर वेगात चालणार, वंदे भारतमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 11:06 PM2022-11-25T23:06:12+5:302022-11-25T23:06:29+5:30
सामान्य ट्रेनने वेगात वळण घेतल्यास ती घसरण्याचा धोका असतो. तसेच ट्रेनमधील वस्तू देखील घसरतात.
देशात येत्या काही वर्षांत वळणावर किंवा उताराच्या बाजुला झुकणाऱ्या ट्रेन धावणार आहेत. परदेशांत अशाप्रकारच्या ट्रेन असून ते तंत्रज्ञान भारतातील १०० वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आणण्यात येणार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्याने याची माहिती दिली.
२०२५ पर्यंत देशात ४०० वंदेभारत ट्रेन तयार केल्या जाणार आहेत. यापैकी काही ट्रेन या अमेरिका, युरोपमधील देशांमध्ये निर्यात केल्या जाणार आहेत. भारतातही आता परदेशांप्रमाणे वळणावर झुकणाऱ्या ट्रेन धावणार आहेत. १०० वंदे भारत ट्रेन अशा तंत्रज्ञानाच्या बनविल्या जाणार आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
यासाठी एका कंपनीसोबत करार केला जाणार आहे. या ट्रेनना टिल्टिंग ट्रेन असेही म्हटले जाते. या ट्रेन ब्रॉड गेज ट्रॅकवर वेगाने धावण्यासाठी सक्षम असतील. यामुळे वळणावर या गाड्यांचा वेग कमी करण्याची गरज लागणार नाही. या ट्रेन वेग आणि वळणाचा अंदाज घेऊन एका बाजुला झुकतील आणि बॅलन्स करतील. अशा प्रकारच्या ट्रेन ११ देशांमध्ये चालत आहेत. स्पेनिश निर्माता कंपनी टॅल्गोची यासाठी मदत घेतली जाणार आहे.
सामान्य ट्रेनने वेगात वळण घेतल्यास ती घसरण्याचा धोका असतो. तसेच ट्रेनमधील वस्तू देखील घसरतात. त्यामुळे ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना आर्मरेस्टने दबल्यासारखे वाटते आणि त्यांचा तोल जातो, या परिस्थतीपासून या नव्या ट्रेन वाचविणार आहेत.