यावेळचा ऑटो एक्स्पो ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ रोजी नोएडात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 07:13 PM2017-09-27T19:13:59+5:302017-09-27T19:19:40+5:30
ग्रेटर नोएडामध्ये इंडिया एक्स्पो मार्च येथे ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या काळात ऑटो एक्स्पोमधील मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असते
ग्रेटर नोएडामध्ये इंडिया एक्स्पो मार्च येथे ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या काळात ऑटो एक्स्पोमधील मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असते. मोटार उत्पादक कंपन्या या आपल्या उत्तमोत्तम भावी मोटारी या प्रदर्शनामध्ये लोकांसमोर मांडत असतात. मोटार कंपन्यांच्या मोटारींमध्ये जणू एक सौदर्यस्पर्धाच असावी, असा तो सोहळा असतो. आशियामधील सर्वात मोठा असा मानला जाणारा व जगामधील दुसऱ्या क्रमांकाचाही ठरलेला हा ऑटो एक्स्पो आहे. हा १४ वा ऑटो शो आहे. १९८६ पासून सुरू झाला. येत्या ऑटो अक्स्पोचे उद्घाटन ८ फेब्रुवारीला होणार आहे.
यामध्ये कम्पोनंटस् म्हणजे सुटे भाग, तंत्रज्ञान याचाही एक वेगळा नमुना असतो. हा कम्पोनंट्स बाबतचा शो मात्र दिल्लीत प्रगती मैदानामध्ये ८ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. विविध कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होत असतात. या आधी २०१२ पर्यंत दिल्लीमधील प्रगती मैदानात हा ऑटो एक्स्पो होत असे. आता तो ग्रेटर नोएडामध्ये होतो.वाहन उत्पादकांच्या SIAM एसआयएएम या संघटनेने या येत्या ऑटो एक्स्पोची घोषणा केली आहे. सध्या भारताच्या सरकारची नजर वीजेवरील वाहनांच्या (ईसीव्ही)वापरासाठी वळत आहे. पुढील काळात इलेक्ट्रिक वाहनांबाबत सध्या केंद्राने मांडलेली भूमिका लक्षात घेता या ऑटो एक्स्पोमध्ये त्याचे काय पडसाद उमटतात, कोणती तशा प्रकारची नवी वाहने मांडली जातात, हा भाग यावेळच्या प्रदर्शनामधीलही आकर्षणाचा ठरणार आहे.
१ लाख ८५ हजार चौरस मीटर क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष हा ऑटो शो होणार असून तो नोएडामध्ये असेल तर कंपोनंट्स शो हा यावेळी 'जगाला वाहून नेणारे वाहन तंत्रज्ञान' या संकल्पनेवर आधारित आहे. ६० हजार चौरस मीटर इतक्या क्षेत्रात प्रगती मैदानामध्ये ते होणार आहे.जगभरातील १२०० कंपन्या या कंपनोनंट्स शोमध्ये सहभागी होणार आहे. एसीएमए,एसआयएएम, सीआयआय व ओआयसीए यांनी हा संपूर्ण ऑटो शो आयोजित केला आहे.