Tips For Selling Used Car: जुन्या कारलाही मिळेल जबरदस्त किंमत, फक्त विकण्यापूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:20 PM2022-11-17T15:20:48+5:302022-11-17T15:21:08+5:30
Tips For Selling Used Car: जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की तुम्हाला माहित नाही की ही कार कितीमध्ये विकली जाईल. पण तुम्ही कार विकण्यापूर्वी या टीप्स नक्की फॉलो करा.
जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की तुम्हाला माहित नाही की ही कार कितीला विकली जाऊ शकेल. मात्र, यासोबतच तुम्ही कारची किंमतही तुमच्या मनात ठेवली असेल की, तुम्हाला कार कोणत्या किंमतीला विकायची आहे. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जर तुम्हाला तुमच्या जुन्या कारला चांगली किंमत मिळावी असं वाटत असेल तर काही टीप्स फॉलो करायला हव्या. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत या टीप्स.
कार वॉश
अनेकजण आपल्या कारची काळजी तर घेतच असतात. रोज कार धुतलीही जात असेल. परंतु जर तुमच्याकडे एखादा ग्राहक कार पाहण्यासाठी येत असेल, तर त्याच्या येण्यापूर्वी कार धुवून घ्या. जेणेकरून जेव्हा तो ग्राहक कार पाहिल तेव्हा त्याच्या मनात ती भरली जाईल आणि त्याला तो घेण्याचा मोहही होऊ शकतो.
एक्सटिरिअरची काळजी
ऊन, पाऊस अशा अनेक गोष्टींचा आपल्या कारच्या रंगावर परिणाम होत असतो. जर तुमच्या कारचा रंग फिका पडला असेल तर विक्रीची तयारी करण्यापूर्वी नक्कीच रबिंग करून घ्या. म्हणजेच तुमच्या कारचा रंग पुन्हा चमकू लागेल. त्याचा ग्राहकावर चांगला प्रभाव पडतो.
इंटिरिअरची काळजी
कारचं एक्सटिरिअर जितकं महत्त्वाचं असतं, त्यापेक्षाही अधिक कारचं इंटिरिअरही महत्त्वाचं असतं. गाडीचे इंटिरिअर चांगले नसेल तर त्यात बसलेल्या व्यक्तीलाही ते आवडत नाही. त्यामुळे आतील भाग स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, कार आतून ड्राय क्लीन करण्यास विसरू नका. एखाद्या ग्राहकाच्या मनात तुमची कार भरण्यासाठी ती तितकीच टापटीप असणं गरजेचं आहे.
महत्त्वाची कागदपत्रे
कार सोबतच तिचे पेपर्सही असणं तितकंच महत्त्वाचं आहे. इन्शुरन्स, पीयुसी, रजिस्ट्रेशन अशी कागदपत्रे महत्त्वाचीच असतात. त्यामुळे डील करताना हे पेपर्स आपल्यासोबत ठेवा. जेणेकरून कोणत्याही ग्राहकाला कागदपत्रांमुळे डील रद्द करण्याची संधी मिळणार नाही.
किंमत ठरवा
आपण बहुतेक वेळी कार विकताना आपल्याला हवी असलेली किंमत समोरच्या व्यक्तीला सांगतो. परंतु ती व्यक्ती त्यात काही कमी करण्यास आपल्याला सांगते. अशावेळी आपल्याला नुकसान होण्याची किंवा ती डील बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या किंमतीपेक्षा थोडी किंमत अधिक सांगा. त्यामुळे काही निगोसिएशन झाल्यास तुम्हाला हवी आहे तितकीच किंमत मिळू शकेल.