Car Discount Offers : 'या' कार खरेदी केल्यास होईल 50 हजारांपर्यंतचा फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 01:51 PM2022-09-22T13:51:34+5:302022-09-22T13:52:27+5:30
Car Discount Offers : वाहन उत्पादकांनी आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलती आणि इतर ऑफर सुरू केल्या आहेत.
नवी दिल्ली : देशात सणांचा हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये नवरात्री आणि दिवाळी हे प्रमुख सण आहेत. या सणानिमित्त लोकांना नवीन वाहने खरेदी करायला आवडतात. हे लक्षात घेऊन वाहन उत्पादकांनी आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलती आणि इतर ऑफर सुरू केल्या आहेत.
जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला नवीन कारवर मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफरबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला 5 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या चार कारची माहिती सांगत आहोत. या कारच्या खरेदीवर तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.
Maruti S Presso
मारुती एस्प्रेसो ही एक मायक्रो एसयूव्ही आहे, जी तुम्ही नवरात्रीच्या सणासुदीच्या काळात खरेदी केल्यास तुम्हाला 49,000 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. मारुती सुझुकी या एसयूव्हीवर वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार सूट देत आहे. जर तुम्ही मारुती एस्प्रेसोचे मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट विकत घेतले तर तुम्हाला 49 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते आणि जर तुम्ही या एसयूव्हीचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट खरेदी केले तर तुम्हाला 34 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मारुती एस्प्रेसोची सुरुवातीची किंमत 4.25 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
Renault Kwid
रेनॉल्ट क्विड ही हॅचबॅक सेगमेंटमधील कार आहे. या कारची आकर्षक डिझाईन, फीचर्स आणि मायलेजमुळे मार्केटमध्ये चांगली विक्री होत आहे. या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही रेनॉल्ट क्विड खरेदी केल्यास तुम्हाला 35 हजार रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो. रेनॉल्ट या हॅचबॅकवर देत असलेल्या सवलतींमध्ये 10 हजार रुपयांची रोख सवलत, कॉर्पोरेट सूट 10 हजार रुपये आणि एक्सचेंज बोनस 15 हजार रुपयांचा आहे. रेनॉल्ट क्विडचे बेस मॉडेल 4,64,400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटमध्ये 5,99,000 रुपयांपर्यंत जाते.
Maruti Alto 800
मारुती अल्टो ही देशातील सर्वात स्वस्त एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे, जी खरेदी केल्यावर तुम्हाला 29,000 रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. ही सवलत ऑफर या कारच्या सर्व व्हेरिएंटवर लागू आहे. मारुती अल्टो स्टँडर्डची सुरुवातीची किंमत 3,39,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये, अल्टोची किंमत 5,03,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
Hyundai Santro
ह्युंदाई सॅन्ट्रो ही हॅचबॅक सेगमेंटमधील कंपनीची सर्वात जुनी आणि लोकप्रिय कार आहे. सध्या तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला 28,000 रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. कंपनीची ही सूट या कारच्या सर्व व्हेरिएंटवर लागू आहे. ह्युंदाई सॅन्ट्रोची सुरुवातीची किंमत 4,89,700 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि या कारची किंमत टॉप व्हेरिएंटमध्ये 6,41,600 रुपये आहे.