ईव्ही क्षेत्रातली पहिली चर्चित कंपनी टॉर्क मोटर्स बंद पडली; डीलरकडून पोलिसांत गुन्हा, ग्राहक कोर्टात
By हेमंत बावकर | Published: August 14, 2024 12:20 PM2024-08-14T12:20:53+5:302024-08-14T12:27:59+5:30
Tork Motors Shut Down: हवशा, नवशाने काढलेली टॉर्क मोटर्स बुडाली, डीलरनी शोरुम काढले, ईव्ही ग्राहकांचे भविष्य अंधांतरी लटकले
- हेमंत बावकर
काही वर्षांपूर्वी ईव्हीची बूम आली आणि अनेक हवसे-गवसे कंपन्या काढून ईलेक्ट्रीक स्कूटर, बाईक विकू लागले. या बाजारात ओला, टीव्हीएस आणि बजाज सारख्या कंपन्या स्थिरावल्यानंतर आता या नवख्या कंपन्यांची खरी कसोटी सुरु झाली आहे. ईव्हीचे फायदे-तोटे लोकांच्या लक्षात येऊ लागले असून ते यापासून दूर जाऊ लागले आहेत. यामुळे या नव्या कंपन्यांनी गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. यात पुण्याच्या टॉर्क कंपनीचा समावेश आहे. या कंपनीने गेल्या डिसेंबरपासून शोरुमना एकही ईव्ही मोटरसायकल पुरविलेली नाही. यामुळे या डीलरनी एकत्र येऊन कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील शोरुम बंद पडले आहे. देशभरातील शोरुम बंद पडले असून यामुळे अनेकांची गुंतवणूक वाया गेली आहे. या कंपनीकडील गुंतविलेला पैसा परत मिळावा म्हणून डीलरनी पिंपरीमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ग्राहकही पार्ट्स मिळत नसल्याने व सेवा मिळत नसल्याने वैतागले असून त्यांनीही ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.
अनेकांच्या मोटरसायकल बंद पडल्या असून स्पेअर पार्ट मिळत नसल्याने त्या भंगारात काढाव्या लागण्याची वेळ या लोकांवर आली आहे. टॉर्क मोटर्सची क्रेटॉस ही मोटरसायकल बाजारात आली होती. टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ कपिल शेळके यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पठारे यांच्याशी ईकॉनॉमिक टाईम्सने संपर्क साधला असता ते म्हणाले की, तपास सुरू असून तपशील गोपनीय आहे. पुढील आठवड्यापर्यंत कारवाई केली जाईल.
३१ जुलैपासून कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यांना गेले ७ महिने पगार दिला गेला नव्हता. कंपनीने गेल्या सात महिन्यांपासून पगार दिलेला नसतानाही कर्मचाऱ्यांना “नियोजित वेळेत” रिलीव्हिंग लेटर मिळेल असे नमूद केले आहे.
ग्राहकांचे म्हणणे काय...
आम्ही कष्टाची कमाई या कंपनीच्या ईव्ही मोटरसायकलमध्ये गुंतविली होती. कंपनीने डिसेंबरपासून सेवा देणे बंद केले आहे. आमचा टॉर्क क्रेटॉस ईव्ही मालकांचा 300-400 लोकांचा ग्रुप आहे. यापैकी बहुतांश जणांच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत. स्पेअर पार्ट मिळत नाहीत. शोरुम बंद झाले आहेत. सर्व्हिस मिळत नाही. आम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागितली आहे, असे एका ग्राहकाने लोकमतला सांगितले आहे.