Toyota Hilux: दणकट, पाण्यातूनही आरामात जाणार; टोयोटाचा पिकअप ट्रक आला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 02:21 PM2022-01-20T14:21:23+5:302022-01-20T14:22:12+5:30
Toyota Hilux Pickup truck: हायलक्स हा भारतीय बाजारातील या जपानी कंपनीचा पहिला पिकअप ट्रक आहे. इनोव्हा, फॉर्च्युनरमुळे लोकांच्या हृदयावर राज्य करणारी या कंपनीच्या नवीन श्रेणीला लोक कसा प्रतिसाद देतात ते पहावे लागणार आहे.
मोठी वाहन निर्माता कंपनी टोयोटा किर्लोस्करने नवी कोरी पिकअप एसयुव्ही भारतात सादर केली. Toyota Hilux ही कार मार्चमध्ये भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. हायलक्स हा भारतीय बाजारातील या जपानी कंपनीचा पहिला पिकअप ट्रक आहे. इनोव्हा, फॉर्च्युनरमुळे लोकांच्या हृदयावर राज्य करणारी या कंपनीच्या नवीन श्रेणीला लोक कसा प्रतिसाद देतात ते पहावे लागणार आहे.
टोयोटा हायलक्सची बुकिंग सुरु करण्यात आली असून याच्या किंमतींचा खुलासा मार्चमध्येच केला जाणार आहे. अधिकृत डिलरकडे १ लाख रुपये देवून ही कार बुक करता येणार आहे. या बुकिंगच्या रकमेवरून तुम्हाला किंमतीचा अंदाज आलाच असेल. तर ऑनलाईन बुक करणाऱ्यांसाठी ५०००० रुपयांची बुकिंग अमाऊंट ठेवण्यात आली आहे. ही कार कंपनीच्या बंगळुरूतील प्लांटमध्ये तयार केली जाणार आहे.
टोयोटा हायलक्समध्ये ७ एसआरएस एअरबॅग देण्यात आल्या आहेत. तसेच एबीएस, ईबीडी, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्ट, इलेक्ट्रनिक डिफरन्शियल लॉक (EDL), ऑटोमॅटिक हिल असिस्ट कंट्रोल (HAC), डाऊनहिल असिस्ट कंट्रोल (DAC) आणि ऑटोमॅटिक लिमिटेड स्लिप डिफरन्शियल (ALSD) आदी देण्यात आले आहेत.
टोयोटा हायलक्स ट्रकमध्ये २.८ लिटरचे फोर-सिलिंडर टर्बो-डिझेल इंजिन ६-स्पीड ऑटोमॅटिक आणि ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या सेग्मेंट मधील सर्वोत्तम २०४ HP पॉवर आणि ५०० Nm चे टॉर्क आउटपुट अॅटोमध्ये मिळते. तर मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) प्रकारात २०४ HP पॉवर आणि ४२० Nm चे टॉर्क आउटपुट मिळते. सर्व प्रकारांमध्ये (व्हेरीयंट) ग्राहकांना अत्यंत सहज ऑफ-रोडिंग साठी ४x४ ड्राईव्हट्रेन उपलब्ध आहे.
हायलक्स मध्ये ७०० मिमि पाण्यातून वाट काढण्याची (वॉटर वेडिंग) अद्वितीय क्षमता आहे. नवीन आठ-इंची स्मार्ट प्लेकास्ट टचस्क्रीन ऑडियो, सर्वोत्तम दर्जाची लेदर सीट्स, इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटणसह स्मार्ट एन्ट्री आदी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.