Toyota, Kia, Honda च्या कार महागणार, एप्रिलपासून किंमती वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 07:25 PM2024-03-29T19:25:39+5:302024-03-29T19:26:47+5:30
नवीन आर्थिक वर्ष (FY2024-25) 1 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.
कार कंपन्या साधारणपणे वर्षातून दोव वेळा हमखास वाहनांच्या किंमती वाढवताना दिसतात. सर्वसाधारणपणे कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला आणि नंतर नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला असे घडते. आता नवीन आर्थिक वर्ष (FY2024-25) 1 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. टोयोटा आणि कियाने याची घोषणाही केली आहे. याशिवाय पुढील महिन्यापासून होंडाही आपल्या कारच्या किमती वाढवू शकते.
टोयोटा -
आपण भारतामध्ये काही वाहनांच्या काही व्हेरियंटच्या किमती वाढविणार आहोत, असे टोयोटाने जाहीर केले आहे. या वाहनांच्या किंमतीत सुमारे 1 टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. म्हत्वाचे म्हणजे, वाढलेल्या ऑपरेटिंग खर्चामुळे ही वाढ करण्यात येत आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार असल्याचे कंपनीने म्हले आहे. टोयोटाच्या भारतातील सध्याच्या लाइनअपमध्ये 6.86 लाख ते 2.10 कोटी रुपये किंमतीच्या 10 हूनही अधिक मॉडेल्सचा समावेश आहे.
किआ -
टोयोटा शिवाय, किआने देखील आपल्या वाहनांच्या किंमती वाढविण्याचा खुलासा केला आहे. ही कोरियन कार कंपनी आपल्या मॉडेल्सच्या किमती तब्बल तीन टक्क्यांनी वाढविणार आहे. कंपनीने कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, इनपुट खर्च आणि पुरवठा साखळीशी संबंधित काही कारणे सांगितली आहेत. सध्या भारतात Kia चे चार मॉडेल्स विकली जातात. यांच्या किंमती 7.99 लाख ते 65.95 लाख रुपयांपर्यंत आहेत.
होंडा -
होंडाने अद्याप किंमत वाढीसंदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र काही ऑनलाइन वृत्तांमध्ये, त्यांच्या कारच्या किमतीही वाढू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. सध्या भारतातील होंडच्या ताफ्यात अमेझ, सिटी (सिटी हायब्रिडही) आणि एलिव्हेट यांचा समावेश आहे. या तिन्ही मॉडेल्सच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या भारतात होंडा कारच्या किमती 7.16 लाख ते 20.39 लाख रुपयां दरम्यान आहेत.