New Traffic Rules: विनाहेल्मेट, सीट बेल्टशिवाय प्रवास करताय? नवे नियम आणि दंड वाचा, नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 07:25 AM2021-10-31T07:25:21+5:302021-10-31T07:26:45+5:30
New Traffic Rules, penalties in Maharashtra Soon: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल केले जाणार आहेत. परिवहन विभागाने त्यास मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. विनापरवाना वाहन चालवल्याचा दंड पाच पटीने वाढवून १० हजार करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल केले जाणार आहेत. परिवहन विभागाने त्यास मंजुरी दिली आहे.
फॅन्सी नंबर प्लेटवरही होणार कारवाई
अनेकांना दादा, मामा, बाबा अशा नावानी नंबर प्लेट गाड्यांना लावण्याची सवय असते. मात्र, बाईकस्वारांना आता या सवयीला मुरड घालावी लागणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणे वाहनचालकांना महागात पडणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद नव्या नियमामध्ये करण्यात आली आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास चालकांना १ हजार रुपये दंड आकारला जाईल. विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा परवाना तीन महिन्यासाठी रद्दही केला जाणार आहे. नवीन नियमांची नोटीस जारी केली जाईल, असे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
...तर १० हजार रुपये दंड
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ६ महिने तुरुंगवास आणि किंवा १० हजार रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास २ वर्षे तुरुंगवास आणि किया २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाच्या आधारे नवीन नियम लागू होणार आहेत.
असा असेल दंड