सिंगल राइडमध्ये 6,727Km चा प्रवास! 'या' इलेक्ट्रिक बाईकने रचला इतिहास...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:22 PM2023-09-05T20:22:07+5:302023-09-05T20:23:08+5:30
22 दिवसांमध्ये 14 राज्ये अन् 27 हजार रुपयांची पेट्रोल बचत. आशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद.
Ultraviolette F77: बंगळुरुमधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेटने (Ultraviolette) अलीकडेच आपली नवीन मोटरसायकल 'F77' बाजारात लॉन्च केली आहे. आता या इलेक्ट्रिक बाईकने एक मोठा विक्रम केला आहे. सिंगल राइडमध्ये बाईखने तब्बल 6,727 किलोमीटरचा प्रवास करुन इतिहास रचला आहे. कंपनीने सांगितले की, या कामगिरीसाठी अल्ट्राव्हायोलेट F77 चे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
14 राज्ये अन् आणि -15°C मध्ये बाईक धावली
कंपनीने सांगितले की, या रोमांचक प्रवासाचे नेतृत्व बाला मणिकंदन यांनी केले होते. ते चेन्नईतील अल्ट्राव्हायोलेट F77 च्या पहिल्या ग्राहकांपैकी एक आहेत. हा प्रवास 21 मे 2023 रोजी चेन्नई येथून सुरू झाला. खराब हवामान...कठीण प्रदेशातून जात ही बाईक 14 राज्यांमधून गेली. अखेर 12 जून 2023 रोजी हा प्रवास बेंगळुरुमध्ये संपला. यादरम्यान, बाईक 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि उणे -15 अंश सेल्सिअस तापमानात धावली. या राइड दरम्यान बाइकवर 55 किलोचा अतिरिक्त भार देखील होता, ज्यामध्ये प्रवासादरम्यान वापरल्या जाणार्या आवश्यक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
27,000 रुपयांच्या पेट्रोलची बचत
अल्ट्राव्हायोलेटने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, या प्रवासादरम्यान F77 मोटरसायकलने सुमारे 270 लिटर पेट्रोलची बचत केली. देशातील बहुतांश भागात सध्या पेट्रोल 96 ते 100 रुपये प्रतिलिटर आहे. किमान किंमत देखील जोडली तर बाइकने पेट्रोलवरील जवळपास (270x96 = 25920) 26 हजार रुपये वाचले आहेत. यादरम्यान बाइकने 645 किलो कार्बन उत्सर्जनही रोखले.
कशी आहे अल्ट्राव्हायोलेट F77
F77 चे ओरिजनल आणि रेकॉन, दोन्ही व्हर्जन 38.8 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करते. याचा टॉप स्पीड 147 किमी प्रतितास असून, बाईकमध्ये तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. यात ग्लाइड, कॉम्बॅट आणि ब्लास्टिक मोड मिळतील. ही बाईक दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येते, ज्यात 7.1 kWh आणि 10.3 kWh चा समावेश आहे. या बॅटरी अनुक्रमे 206 किमी आणि 307 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज (IDC) देतात.
कंपनीने या बाइकला फ्युचरिस्टिक डिझाइन दिले आहे. बाइकमध्ये मोनोशॉक आणि इनव्हर्टेड फोर्क सेटअप, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. एलईडी हेडलाइट्स, टेललॅम्प्स आणि डे टाईम रनिंग लाइट्स (DRL's) बाईकला अजून आकर्षक बनवतात. यात स्मार्ट टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये बाइकचा वेग, बॅटरीची स्थिती यासंबंधी माहिती उपलब्ध आहे. कंपनी दोन्ही बॅटरीवर 8 वर्षांपर्यंत किंवा 1 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देत आहे. या बाईकची किंमत 3.8 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.