कार किंवा बाईकचं RC हरवलंय?, घरबसल्या करता येणार अर्ज; पाहा सोप्या स्टेप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:54 PM2021-12-29T14:54:35+5:302021-12-29T14:54:56+5:30
Vehicle RC Book/Card : तुमच्या वाहनाचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) हे गाडीचं अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे.
तुमच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणेच, वाहन चालवताना नोंदणी प्रमाणपत्र नेहमी तुमच्यासोबत असले पाहिजे. या प्रमाणपत्राचा अर्थ असा आहे की तुमचे वाहन तुमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नोंदणीकृत आहे. हे प्रमाणपत्र एकतर पुस्तक (RC Book) किंवा स्मार्ट कार्ड (RC Card) स्वरूपात असते.
कधी अनावधानानं आरसी आपल्याकडून हरवतं किंवा खराब होतो. अशावेळी आपल्याला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या घरच्या सहजरित्या डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता. मात्र, अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. केव्हाही आरसी हरवलं किंवा खराब झालं तर त्याची त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार करा. प्रादेशिक परिवहन कार्यालयालादेखील यासंदर्भात लेखी कळवा. ज्या ठिकाणाहून तुम्हाला आरसी जारी करण्यात आलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लेखी कळवावं लागेल.
त्यानंतर त्याच आरटीओमध्ये डुप्लिकेट आरसीसाठी तुम्हाला फॉर्म २६ भरावा लागेल. याशिवाय त्यासाठी मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम ८१ मध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य शुल्क भरावं लागेल. यासाठी तुम्हाला फॉर्म २६ अॅप्लिकेशन, पोलीस सर्टिफिकेट, पीयुसी, व्हॅलिड इन्शूरन्स, पत्त्याचा पुरावा, कोणतंही पेंडिंग चलान नसावं, पॅन कार्डाची कॉपी, आरसी हरवल्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र अशा काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
डुप्लिकेट आरसीसाठी काय कराल?
तुम्हाला डुप्लिकेट आरसीसाठी अप्लाय करताना https://parivahan.gov.in/parivahan//en या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Online Services या ऑप्शनवर जाऊन vehicle-related services यावर क्लिक करावं लागेल. ज्या राज्यात वाहन रजिस्टर आहे ते निवडावं लागेल. राज्य निवडल्यानंतर त्या ठिकाणच्या Duplicate RC online या ऑप्शनला निवडा. त्या ठिकाणी आलेला फॉर्म भरा आणि ऑटो जनरेटेड डिटेल्स व्हेरिफाय करा.
याशिवाय शुल्कही ऑनलाईन भरता येईल. तुमचं वाहन कोणत्या कॅटेगरीतील आहे यावर शुल्क निश्चित केलं जाईल. त्यानंतर एक रिसिट जनरेट होईल, ती तुम्हाला तुमच्या कागदपत्रांसोबत ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीच्या कार्यालयात जमा करावी लागेल.