चिप तुटवड्यामुळे वाहन विक्रीला लागला ब्रेक; किमतीमध्ये झालेल्या वाढीचाही अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 06:11 AM2021-11-02T06:11:46+5:302021-11-02T06:11:59+5:30
ऑक्टोबरमध्ये बहुतांश कंपन्यांना फटका काही महिन्यांपासून सेमिकंडक्टर चिपचा तुटवडा आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली हाेती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सेमिकंडक्टर चिपच्या तुटवड्याचा परिणाम वाहनविक्रीवर झाला आहे. चारचाकी तसेच दुचाकी वाहनांच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. ऑक्टाेबरमध्ये सर्वच कंपन्यांची वाहनविक्री कमी झाली आहे.
काही महिन्यांपासून सेमिकंडक्टर चिपचा तुटवडा आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली हाेती. मात्र, चिप तुटवड्याचा परिणाम वाहनांच्या पुरवठ्यावर झाला. कंपन्यांनी त्यावर मात करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तरीही वाहनविक्री घटली आहे. देशातील सर्वात माेठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाची कारविक्री २४ टक्क्यांनी घटली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टाेबरमध्ये १ लाख ३८ हजार ३३५ वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये हाच आकडा १ लाख ८२ हजार ४४८ एवढा हाेता.
दुचाकी विक्रीवर परिणाम
दुचाकी वाहनांच्या विक्रीतही घट नाेंदविण्यात आली आहे. बजाज ऑटाे आणि टीव्हीएस माेटर्सने अनुक्रमे १४ आणि १० टक्के घट नाेंदविली आहे. बजाजच्या ४ लाख ३९ हजार ६१५ वाहनांची विक्री झाली. तर टीव्हीएसने ३ लाख ५५ हजार ३३ दुचाकी विक्री केली. कंपनीने याच कालावधीत गेल्या वर्षी ३ लाख ९४ हजार दुचाकी विकल्या हाेत्या. तर बजाज ऑटाेने गेल्या वर्षी ५ लाख १२ हजार वाहनांची विक्री केली हाेती. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीतही २२ टक्के घट झाली आहे. तसेच निर्यातीमध्येही ४ टक्के घट नाेंदविण्यात आली. त्या तुलनेत टीव्हीएसच्या निर्यातीत ३ टक्के वाढ झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वाढ
अशाेक लेलँडच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे. ऑक्टाेबरमध्ये ११ हजार ७९ वाहनांची विक्री झाली. याशिवाय आयशर माेटर्स समूहाने ३८ टक्के वाढ नाेंदविली आहे. कंपनीने ५ हजार ८०५ वाहनांची विक्री केली.