बापरे, धक्कादायक आकडेवारी...! एकट्या जानेवारीत एवढी वाहने विकली गेली; कुठे चालविणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:13 IST2026-02-10T14:12:47+5:302026-02-10T14:13:56+5:30
Vehicle Sales January 2026: जानेवारी २०२६ मध्ये भारतीय ऑटो मार्केटमध्ये विक्रमी विक्री. १८.५ लाख बाईक आणि ५.१३ लाख कारची विक्री झाली. पाहा सर्व सेगमेंटचा सविस्तर डेटा.

बापरे, धक्कादायक आकडेवारी...! एकट्या जानेवारीत एवढी वाहने विकली गेली; कुठे चालविणार...
भारतीय वाहन उद्योगासाठी वर्ष २०२६ ची सुरुवात अत्यंत दमदार झाली आहे. परंतू, विक्री वाढली असली तरी एक चिंता कमालीची वाढत चालली आहे. कारण हा विक्रीचा आणि वाहतूक कोंडीचा आकडा पाहता भविष्यात हे संकट आणखी मोठे होणार आहे.
'फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल्स डीलर्स असोसिएशन'च्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी २०२६ मध्ये देशात एकूण २७,२२,५५८ वाहनांची विक्री झाली आहे. जानेवारी २०२५ च्या तुलनेत या विक्रीत १७.६१ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे, तर डिसेंबर २०२५ च्या तुलनेत ही वाढ तब्बल ३४ टक्के इतकी आहे. या जानेवारी महिन्यात १८.५२ लाखांहून अधिक दुचाकींची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यात २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. हिरो मोटोकॉर्प, होंडा आणि टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांचे वर्चस्व कायम आहे. तर कार सेगमेंटमध्ये ५,१३,४७५ युनिट्सची विक्री झाली. ही वार्षिक ७ टक्क्यांची वाढ आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्सच्या गाड्यांना ग्राहकांनी मोठी पसंती दिली आहे.
२७ लाख हा आकडा काही कमी नाही. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्लीसह आता छोट्या छोट्या शहरांचे देखील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. विकेंडला अनेकदा देशातील पहिला एक्प्रेसवे देखील पॅक झालेला असतो. गाड्यांमध्ये येणारे क्रूझ कंट्रोल फिचर वापरता येत नाही, अशी अवस्था सध्या वाहन चालकांची आहे. आज प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला एक स्कूटर, मोटरसायकल आहेच. पार्किंगला जागा नसताना एका घरात दोन,तीन चारचाकी घेतल्या जात आहेत. यामुळे सोसायट्यांचा परिसरच नाही तर ये-जा करणारे रस्ते देखील दुतर्फा पार्किंगमुळे फुल झालेले आहेत.
इतर सेगमेंटची कामगिरी
तीनचाकीमध्ये १.२७ लाख युनिट्सची विक्री झाली असून यात ई-रिक्षाचा मोठा वाटा आहे. तर शेती व्यवसायातील तेजीमुळे १.१४ लाख ट्रॅक्टरची विक्री झाली, जी वार्षिक २२.८९ टक्क्यांनी वाढली आहे. ट्रक, टेम्पोसारख्या वाहनांनी देखील १५ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. १.०७ लाख व्यावसायिक वाहनांची विक्री झाली आहे.
नव्या वर्षाची सुरुवात, आकर्षक ऑफर्स आणि वाढलेली मागणी यामुळे ग्राहकांनी शोरूममध्ये मोठी गर्दी केली. फाडाच्या मते, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातून मागणी वाढल्याने विक्रीचे आकडे वधारले आहेत.