वाहनांच्या विक्रीमध्ये ऑगस्टमध्ये झाली वाढ; वर्षातील सर्वोत्तम कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:29 AM2020-09-12T01:29:05+5:302020-09-12T07:12:21+5:30
चांगल्या दिवसांची सीआमला आशा
नवी दिल्ली : गणेशोत्सव आणि ओणमसारख्या उत्सवाच्या काळात वाहनांची मागणी वाढली असल्यामुळे कार आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीतही समाधानकारक वाढ झाली आहे.
सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स या संस्थेच्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री १४.१६ टक्क्यांनी वाढून ती दोन लाख १५ हजार ९१६ झाली. याशिवाय कारची विक्रेत्यांकडे पाठवणीही १४.१३ टक्क्यांनी वाढून १ लाख २४ हजार ७१५ इतकी झाली आहे. मालवाहतुकीच्या छोट्या वाहनांची (यूटिलिटी व्हेईकल) विक्रीही आॅगस्टमध्ये १५.५४ टक्क्यांनी वाढली असून, ती ८१ हजार ८४२ वाहने अशी झाली आहे.
सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सीआम) दुचाकी वाहनांच्या विक्रीसंदर्भातील आकडेवारीही जाहीर केली आहे.
गेल्या वीस महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रथमच दुचाकी वाहनांची विक्री वाढली असून, देशांतर्गत उत्पन्नाच्या ७ टक्के इतका वाटा असलेल्या आॅटोमोबाइल क्षेत्राने कोरोना लॉकडाऊनसारख्या प्रतिकूल स्थितीचा सामना करत उत्तम कामगिरी केली आहे. या क्षेत्रासाठी एप्रिल महिना ठप्प राहिला तरी त्यानंतरच्या महिन्यांमध्ये विक्रीत वाढ होत गेली. गणेशोत्सव आणि ओणमसारख्या उत्सवामुळे सन २०१८च्या जून महिन्यानंतर आॅगस्ट महिना विक्रीसाठी सर्वोत्तम राहिला आहे.
यासंदर्भात सीआमचे अध्यक्ष केनिची आयुकावा म्हणाले की, आम्ही विक्रीमध्ये वाढ होत असल्याचे अनुभविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या उद्योगामध्ये विशेषत: दुचाकी आणि प्रवासी वाहनांच्या प्रकारात पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
आॅगस्ट २०२०मधील प्रवासी वाहनांच्या विक्रीतील १४ टक्क्यांची तसेच दुचाकी विक्रीमध्ये झालेली ३ टक्क्यांची वाढ ही उद्योग उभारी
घेत असल्याचे दर्शवित आहे. महासंचालक राजेश मेमन यांनीही आगामी उत्सव काळात आणखी चांगले दिवस येतील, अशी सकारात्मकता व्यक्त केली.
आॅगस्टमधील वाहनांची विक्री
च्१० लाख ३२ हजार ४७६ मोटरसायकलींची विक्री (१०.१३ टक्क्यांनी वाढ)
च्४ लाख ५६ हजार ८४८ स्कूटर्सची विक्री (१२.३० टक्क्यांची घट )
च्एकूण दुचाकी वाहनांच्या विक्रीत ३ टक्क्यांची वाढ. १५ लाख ५९ हजार ६६५ दुचाकींची झाली विक्री.
च्तीन चाकी वाहनांची विक्रीत ७५.२९ टक्क्यांची घट. १४ हजार ५३४ वाहनांची विक्री.