फोक्सवॅगनच्या पेट्रोल, डिझेलच्या कार 2026 पर्यंत बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 11:30 AM2018-12-06T11:30:07+5:302018-12-06T11:40:59+5:30
जगभरात इंधन साठ्यांची कमतरता आणि प्रदूषण या समस्यांमुळे सर्वच देश विजेवर चालणाऱ्या कारना प्रोत्साहन देत आहेत.
मुंबई : जर्मनीची दिग्गज कार निर्माता कंपनी Volkswagen पुढील काही वर्षांमध्ये पेट्रोल, डिझेल कारचे उत्पादन हळूहळू कमी करणार असून 2026 मध्ये पूर्णत: बंद होणार आहे. यानंतर कंपनी केवळ इलेक्ट्रीक कार विकणार आहे.
जगभरात इंधन साठ्यांची कमतरता आणि प्रदूषण या समस्यांमुळे सर्वच देश विजेवर चालणाऱ्या कारना प्रोत्साहन देत आहेत. यामुळे कंपन्यांनीही हे आव्हान स्वीकारले असून पुढील दहा वर्षांत नवीन तंत्रज्ञान विकसित करून चांगल्या इव्ही कार बनविणार आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विकल्या गेलेल्या कार त्यांची मुदत संपेपर्यंतच रस्त्यावर धावू शकणार आहेत. या नंतर केवळ इव्ही कारच सर्वत्र दिसणार आहेत.
Volkswagen ने नुकतीच एक घोषणा केली होती. 2023 मध्ये 44 अब्ज युरोची गुंतवणूक इलेक्ट्रीक वाहनांसाठी करण्यात येणार आहे. 2015 मध्ये पॅरिस जलवायू करारानुसार Volkswagen शून्य उत्सर्जन करणाऱ्या कार बनविण्यासाठी काम करणार आहे. यावेळीच कंपनीने पेट्रोल- डिझेलच्या कार बंद करण्याचे संकेत दिले होते.
इलेक्ट्रीक वाहनांसाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ संशोधनासाठी नियुक्त केले आहे. तसेच काही अन्य कंपन्यांसोबतही Volkswagen ने तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी प्रयत्न चालविले आहेत.