जरा थांबा! टाटा पंच ईव्ही नेक्सॉनपेक्षा जास्त रेंज देणार? कंपनीच्या डायरेक्टरनीच केली 'लीक'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 01:02 PM2023-10-27T13:02:26+5:302023-10-27T13:02:40+5:30
टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत. यापैकी दोन फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. यात आणखी दोन फाईव्ह स्टार वाल्या कार वाढणार आहेत.
गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील टाटाची उपस्थिती लक्षणियरित्या वाढली आहे. सगळीकडे टाटाच्या कार दिसू लागल्या आहेत. कधी काळी टाटाने कार बनवू नये, ट्रकच बनवावेत असे सांगितले जायचे. परंतू, आता टाटाच टाटा ते पण फाईव्ह स्टार असे समीकरण झाले आहे. यात ईलेक्ट्रीक कारची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना टाटा आणखी तीन कार ईलेक्ट्रीकमध्ये आणत आहे. खप वाढल्याने टाटाने ईव्ही कारचा बिझनेस इंधनावरील कारच्या बिझनेसपासून वेगळा करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत. यापैकी दोन फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. यात आणखी दोन फाईव्ह स्टार वाल्या कार वाढणार आहेत. सुरक्षेविषयी जागरुक झालेले लोक आता टाटाच्या कार घेत आहेत. कमी बजेटमध्ये टाटा टियागो, टिगॉर ईव्ही आणि जास्त बजेटमध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही उपलब्ध आहे. परंतू. आता मधल्या सेगमेंटमध्ये टाटा नेक्स़ॉनपेक्षाही जास्त रेंज असलेली कार आणण्याच्या तयारीत आहे.
टाटा पंच लवकरच ईव्हीमध्ये देखील येत आहे. टाटा नेक्सॉनची मॅक्सची रेंज ४६५ किमी असताना पंच ५०० किमीपेक्षा जास्तीची रेंज देणार असल्याचे संकेत टाटाच्याच बड्या अधिकाऱ्यांनी केले आहे. टाटाचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा यांनी एका मुलाखतीत टाटा पंच, हॅरिअर आणि कर्व्ह ईव्हीची रेंज सांगितली आहे. ईव्हीच्या बॅटरींची किंमत कमी होत आहे. यामुळे याचा फायदा आम्ही कारची रेंज वाढविण्यासाठी करत आहोत. येत्या काळात पंच ईव्ही, हॅरिअर आणि कर्व्ह ईव्हीच्या रेंज ५०० प्लस असतील. यामुळे ग्राहकांना रेंजची चिंता करत राहण्याचे कारण उरणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
टाटा पंच ही टियागो आणि नेक्सॉन ईव्हीच्या मधील रेंजची जागा घेईल असे सांगितले जात होते. परंतू, चंद्रा यांच्या वक्तव्यानंतर पारडेच पालटले आहे. पंच ईव्ही ५०० किमीपेक्षा जास्तीची रेंज देऊ लागली तर नेक्सॉन मागे पडण्याची शक्यता आहे. सध्या नेक्स़ॉन ३५० ते ४६५ किमी पर्यंतची रेंज देते. त्यापेक्षा ४० ते ५० किमी जास्तीची रेंज पंच देण्याची शक्यता आहे.