सेकंड हँड कार घेताना बघू नका नुसतीच चमक, या ५ मोलाच्या गोष्टी लक्षात ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 01:51 PM2022-09-25T13:51:16+5:302022-09-25T13:52:53+5:30
या गोष्टींकडे लक्ष द्याल, तर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
इंजिन : कोणत्याही गाडीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिन. हे तपासण्यासाठी एखादा तज्ज्ञ ड्रायव्हर किंवा तंत्रज्ञ सोबत घ्या. टेस्ट ड्राइव्ह घ्या, त्यामुळे कारचे स्विच, ब्रेक, क्लच, गियर, एक्सिलरेटर व इतर फंक्शन्सही तपासता येतील. गाडी किती किमी धावली हेही बघा.
१५ वर्षे : सेकंड हँड कार १५ वर्षांपेक्षा जुनी नसावी. मोटार वाहन कायद्यानुसार १५ वर्षांहून जुने वाहन रस्त्यावर उतरवण्याची परवानगी नसते. त्यासाठी स्क्रॅप धोरण आहे. त्यामुळे मॉडेलची योग्य माहिती मिळवा. आरसीमध्ये सर्व माहिती मिळते. स्वस्तात कालबाह्य कारच्या फंदात पडू नका.
कागदपत्रे : कारची सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आरसी, सर्व्हिस रेकॉर्ड, पीयूसी, विमा बघून घ्या. खरेदीदार-विक्रेता दोघांच्याही हिताचे विक्रीपत्र तयार करा. गाडी चोरी झाली की नाही हे ऑनलाइन तपासा. विमा आणि नो क्लेम बोनस हिस्ट्री बघताना कारचा अपघात किंवा अन्य सर्व घटनांची माहिती मिळते.
मायलेज : अनेकदा जुन्या गाड्यांचा मायलेज कमी झालेला असतो. त्यामुळे कार हायवेवर तसेच खडबडीत रस्त्यावर चालवून मायलेजची माहिती मिळवा. यात फ्रेम, ब्रेकिंग आणि सस्पेंशनही तपासले जाते. कारचे अलाइनमेंट तपासा. गाडीचा कोणताही भाग कोणत्याही बाजूला झुकलेला नसावा याची खात्री करण्यासाठी सपाट जागेवर गाडी उभी करा.
कार कंडीशन : एक्स्टीरियर-इंटीरियर चेक करा. बाहेरून डेंट पडला किंवा पेंट निघाला का हे बघा. इंटीरियरमध्ये कारचे सीट, स्टीअरिंग व्हील, डॅश बोर्डचे फंक्शन, विंडो आणि दरवाजे इत्यादी तपासा.