हेडलाईटमध्ये पाणी, दरवाजे, बॉनेट डॅमेज! टाटा शोरुमने ग्राहकाला वाईट कंडिशनमधील Nexon दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 05:17 PM2023-12-12T17:17:38+5:302023-12-12T17:19:17+5:30
टाटाच्या सर्व्हिसबाबत अनेकदा ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. परंतु, टाटाची देशातील पहिली फाईव्ह स्टार सेफ्टीवाली कार घेणाऱ्या ग्राहकाला अत्यंत बेकार परिस्थितीतील कार डिलिव्हर करण्यात आली आहे.
स्वदेशी कंपनी, दणकट कार बनविणाऱ्या कंपनी टाटा मोटर्सने दुसरा क्रमांक पटकविला आहे. परंतु, या कंपनीला आता सर्व्हिसमध्ये मोठी सुधारणा करण्याची वेळ आलेली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार ग्राहकाने कंटाळून थेट रतन टाटांना ट्विट करत आपली समस्या मांडलेली असताना आता बंगळुरूमधून धक्कादायक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवी कोरी कार घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला अत्यंत वाईट अनुभव आला आहे.
टाटाच्या सर्व्हिसबाबत अनेकदा ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. परंतु, टाटाची देशातील पहिली फाईव्ह स्टार सेफ्टीवाली कार घेणाऱ्या ग्राहकाला अत्यंत बेकार परिस्थितीतील कार डिलिव्हर करण्यात आली आहे. नव्या कोऱ्या टाटा नेक्सॉन एसयुव्हीची अशी हालत पाहून कंपनीने देखील यात लक्ष घातले आहे.
बंगळुरुच्या शरथ कुमार यांनी नवी कोरी टाटा नेक्सॉन खरेदी केली आहे. जेव्हा मोठ्या आनंदाने ते कुटुंबासोबत डिलिव्हरी घेण्यासाठी शोरुममध्ये गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला. ज्या कारवर त्यांनी १८ लाख रुपये मोजले होते, त्या कारची अवस्था अत्यंत बिकट होती. याचा व्हिडीओ शरथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये कारच्या हेडलाईटमध्ये पाणी गेल्याचे दिसत आहे. सोबतच कारचे दरवाजे, बोनेट आदी डॅमेज असल्य़ाचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
येलहंकाच्या डीलरला ग्राहकाने अत्यंत खराब डीलर म्हटले आहे. त्याला प्री डिलिव्हरी इंस्पेक्शन किंवा क्वालिटी चेक करू दिले नव्हते, असा दावा या ग्राहकाने केला आहे. विचारात घेण्याची बाब म्हणजे या कार ग्राहकाला देण्यापूर्वी आरटीओमध्ये रजिस्टर केल्या जातात, यामुळे अशा कार ग्राहकांच्या माथी मारणे कंपन्यांना सहज सोपे झाले आहे. या घटनेला एक महिना झाला असून प्रेरणा मोटर्स आणि टाटा दोघांनीही कारची रिप्लेसमेंट किंवा रिफंड देण्यात स्वारस्य दाखविले नसल्याचा दावा या ग्राहकाने केला आहे. उलट डीलरशीपने कारची दुरुस्ती आणि २ वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी ऑफर केली आहे. ही कार चालविण्यास योग्य असल्याचे डीलर त्या ग्राहकाला समजावत आहे.
वैतागलेल्या शरथ यांनी तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यानंतर टाटाचे डोळे उघडले आहेत. अधिकृत हँडलवरून शरथ यांच्याशी संपर्क साधत गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, कृपया तुमचा ई-मेल आयडी DM द्वारे सामायिक करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला संबंधित टीमकडून लवकरच मदत करू शकू, एवढेच म्हटले आहे.