Ola Electric Scooter Actual Range: ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरची खरी रेंज किती? 181 किमी? नाही...; मोठे अंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:26 PM2021-12-21T21:26:18+5:302021-12-21T21:28:07+5:30
Ola Electric Scooter true Range: ओलाची स्कूटर लाँच करताना कंपनीने एस१ ची रेंज 121 किमी आणि एस1 प्रो ची रेंज 181 किमी आहे असा दावा केला होता. परंतू, ही कागदावरची रेंज झाली.
पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने लोकांना इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रस वाढवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर आहे ती ओलाची इलेक्ट्रीक स्कूटर एस१ आणि एस१ प्रो. परंतू ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कंपनी काहीशी मागे पडू लागली आहे. वेळेवर डिलिव्हरी न देणे, दिली तर बरेच फिचर्स गायब असणे आदी परिस्थितींचा सामना कंपनीला करावा लागत आहे. अशातच आता ओलाच्या या स्कूटरची खरी रेंज समोर आली आहे.
ओलाने दोन म़ॉडेल लाँच केली आहेत. ओला एस१ आणि ओला एस १ प्रो अशा या मॉडेलची नावे आहेत. ओलाची स्कूटर लाँच करताना कंपनीने एस१ ची रेंज 121 किमी आणि एस1 प्रो ची रेंज 181 किमी आहे असा दावा केला होता. परंतू, ही कागदावरची रेंज झाली. प्रत्यक्षात रस्त्यावर यापेक्षा कमी रेंज या स्कूटरची आहे आणि हे ओलानेच जाहीर केले आहे.
ओलाने इलेक्ट्रीक स्कूटरची डिलिव्हरी सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात ही स्कूटर रस्त्यावर आल्यावर खरी वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ लागली आहे. यामुळे कंपनीने आधीच ओला एस१ प्रो रस्त्यावर किती रेंज देते याचा आकडा जाहीर केला आहे. ओलाची एस१ प्रो स्कूटर सिंगल चार्जमध्ये 135 किमीची रेंज देते असे कंपनीने म्हटले आहे. यानुसार ओलाची एस१ अंदाजे 70-80 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे. Ola S1 Pro चार्ज होण्यासाठी वॉल चार्जरद्वारे साडे सहा तास लागतात तर Ola S1 ला चार्ज होण्यासाठी 4 तास 48 मिनिटे लागतात. रशलेनने याबाबतचे वृत्त दिले आहे.