इथेनॉल मिश्रित पेट्रोल E-20 वापरून तुमचे नवीन किंवा जुने वाहन किती मायलेज देईल? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 04:19 PM2023-02-10T16:19:41+5:302023-02-10T16:20:23+5:30
ethanol mixed petrol : येत्या 2 वर्षात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची देशभरात विक्री सुरू करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे.
नवी दिल्ली : जैविक इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोल (Ethanol Mixed Petrol) ई-20 (E-20) ची विक्री सुरू केली आहे. गेल्या सोमवारपासून देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-एनसीआरसह देशातील 15 शहरांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
येत्या 2 वर्षात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची देशभरात विक्री सुरू करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. रिलायन्स आणि बीपी यांच्या संयुक्त उपक्रमाने इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे नाव E-20 पेट्रोल ठेवले आहे. इथेनॉल मिश्रित असलेले पेट्रोल बीएस-4 ते बीएस-6 टप्प्यापर्यंतच्या सर्व वाहनांमध्ये वापरले जाऊ शकते. या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या मायलेजवर आणि पेट्रोलच्या किमतीवर काय परिणाम होईल, याबाबत जाणून घ्या...
सोमवारी E-20 चे लॉन्चिंग करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उद्दिष्टाच्या अगोदर E-20 ची अंमलबजावणी केली जात आहे. 2014 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 1.5 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळल्याने देशाची दरवर्षी 53 हजार 894 कोटी रुपयांची बचत होते. इथेनॉलच्या वाढत्या वापराचा फायदा शेतकऱ्यांनाही होतो.
इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे फायदे
आता केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल 10 टक्क्यांवरून 20 टक्के केले आहे. सध्या देशातील 15 शहरांमधील 84 पेट्रोल पंपांवर ही सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच वाहन उत्पादक कंपन्यांना E-20 इंजिन तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आजपर्यंत पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रित वापरताना कोणतीही अडचण आल्याची तक्रार नाही.
मोदी सरकारची काय आहेत तीन उद्दिष्टे
विशेष म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत मोदी सरकारने अनेक उद्दिष्टे निश्चित केली आहेत. पहिले म्हणजे पेट्रोलची आयात कमी करणे, दुसरे म्हणजे दिल्ली-एनसीआरसह देशातील मोठ्या शहरांमधील प्रदूषण कमी करणे आणि तिसरे म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे. दरम्यान, आपल्या माहितीसाठी इथेनॉल उसापासून तयार होते. देशातील अनेक राज्यांमध्ये उसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे.
मायलेजसह मिळेल अधिक पॉवर
दरम्यान, इथेनॉल मिश्रित पेट्रोल E-20 ची विक्री सुरू झाली असली तर अद्याप पेट्रोलचे दर कमी होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच, पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकार एकत्र केले तर कराचा बोजा सुमारे 52 टक्के आहे. मात्र, इथेनॉलवरील कर अजूनही कमी आहे. याचबरोबर, तुम्हाला E-20 इंधनामुळे चांगल्या मायलेजसह अधिक पॉवर मिळेल. परंतु, जुन्या इंजिन असलेल्या वाहनांमध्ये E-20 पेट्रोल टाकल्यास कमी मायलेज आणि कमी पॉवर मिळण्याची शक्यता असते.