नवीन कार घेताना कोणती काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 02:59 PM2018-11-06T14:59:39+5:302018-11-06T15:56:44+5:30
सणासुदीचे दिवस आहेत. कंपन्या घसघशीत डिस्काऊंटही देत आहेत. नवीन कार घेणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मागणी वाढलेली असल्याने डीलरवरही दबाव आहेच. ...
सणासुदीचे दिवस आहेत. कंपन्या घसघशीत डिस्काऊंटही देत आहेत. नवीन कार घेणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मागणी वाढलेली असल्याने डीलरवरही दबाव आहेच. अशा काळात नवीन कारची डिलिव्हरी घेताना काही काळजी घेतल्यास फायद्याचे ठरू शकते.
गाडीची चौकशी करतेवेळी डीलरने काही आश्वासने दिलेली असतात. ती पूर्ण केलीत का ते पहावे. अॅक्सेसरीजच्या नावाखाली भली मोठी रक्कम उकळली जाते. ती टाळावी. तसेच कार डीलरकडे ने-आण करताना आदळलेली किंवा घासलेली असू शकते. मात्र, हे लपविण्यासाठी रंगकाम केले जाते. असा प्रकार ओळखण्यासाठी बोटांनी हलक्या स्पर्शाने चारही बाजुंना चाचपडून घ्यावे. रंग केलेला असल्यास ओबडधोबडपणा हाताला जाणवतो.
डीलरकडे कंपनीचे रंग असतात. तरीही कंपनीतील रंग आणि त्यांच्याकडील रंगामध्ये फरक असतो. तो लाईटमध्ये दिसत नाही. यासाठी गाडीची डिलिव्हरी दिवसा उजेडात घ्यावी. तसेच दरवाजा चेपला गेला असल्यास त्यावर पीओपी सारखा पदार्थ वापरून लेव्हल केलेली असते. ही दुरुस्ती तपासण्यासाठी दरवाजाच्या समांतर जाऊन आजुबाजुच्या वस्तुंचे प्रतिबिंब पाहावे. ते सरळ असल्यास वाहन चांगल्या अवस्थेत आहे असे समजावे. हेडलाईट, इंडिकेटर, एसी, अॅटोमॅटीक गिअर, इंधन टाकीचा नॉब याची माहिती घ्यावी. प्रत्येक कंपनीनुसार या बटनांची जागा बदललेली असते. अन्यथा ऐनवेळी गोंधळ होतो.