चुकीचे वाहतूक चलन पाठविले गेले? इथे ऑनलाईन करा तक्रार; कोर्टात जायची गरज नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:02 IST2025-02-26T13:00:25+5:302025-02-26T13:02:00+5:30
Traffic Police Challan challenge: तुम्ही न केलेल्या चुकीचा दंड भरावा लागत असेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला इथे ती पावती कशी रद्द करावी किंवा भरलेला दंड कसा मागे घ्यावा ते सांगणार आहोत.

चुकीचे वाहतूक चलन पाठविले गेले? इथे ऑनलाईन करा तक्रार; कोर्टात जायची गरज नाही...
सध्या वाहतूक विभाग डिजिटल झाला आहे. पूर्वी थांबवून पावती फाडली जायची, मध्यंतरी पोलिसांकडील मोबाईल कॅमेरातून फोटो काढून पावती पाठविली जायची. आता सीसीटीव्ही आणि पोलिसांना दिलेली पावती बनविण्याच्या यंत्रांद्वारे फोटो काढून वाहनचालकांना पावत्या दिल्या जात आहेत. अशावेळी चुकीच्या पावत्यादेखील येत आहेत. दंड ५०० रुपयांपासून ते २ ते ४ हजार रुपयांपर्यंत असल्याने मोठा भुर्दंड वाहन चालकांना बसत आहे. अशावेळी पोलिसांकडे गेल्यास कोर्टात जाऊन रद्द करण्यास सांगितले जाते. परंतू, ऑनलाईन पावतीला ऑनलाईनच आव्हान देता येणार आहे.
तुम्ही न केलेल्या चुकीचा दंड भरावा लागत असेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला इथे ती पावती कशी रद्द करावी किंवा भरलेला दंड कसा मागे घ्यावा ते सांगणार आहोत.
जर तुमच्या गाडीचे चलन चुकीच्या पद्धतीने केले गेले असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला रस्ते परिवाहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. morth.nic.in वरे गेल्यावर Grievance च्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. तिथे तु्म्हाला सर्व माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर आणि चलन नंबर टाकावा लागणार आहे. सर्व माहिती दिल्यानंतर फॉर्म भरावा, यानंतर तुम्ही केलेल्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि खरी निघाल्यास चलन रद्द केले जाईल.
याशिवाय महाराष्ट्रात या लिंकवर तुम्ही पावतीविरोधात तक्रार नोंदवू शकता... इथे क्लिक करा...
ऑफलाईनही करता येते...
तुम्ही ऑफलाईनही तक्रार करू शकता. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तिथे विचारणा करावी. वाहतूक मुख्यालय जिथे असेल तिथे किंवा तिथला कंट्रोल रुम नंबरवर फोन करून तुम्ही तक्रार नोंद करू शकता. अनेकदा पोलीस कोर्टात जाऊन चलन रद्द करण्यास सांगू शकतात.