सेल्फ ड्रायव्हिंग कारचा अपघात झाल्यास शिक्षा कोणाला?, जाणून घ्या नियम काय सांगतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 10:39 AM2022-08-21T10:39:03+5:302022-08-21T10:39:51+5:30
ऑटोमोबाईल उद्योग खूप वेगाने विकसित होत आहे यात शंका नाही. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. ऑटोनॉमस कार यापैकीच एक.
ऑटोमोबाईल उद्योग खूप वेगाने विकसित होत आहे यात शंका नाही. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. ऑटोनॉमस कार यापैकीच एक. त्यांना सेल्फ ड्रायव्हिंग कार असेही म्हणतात. अशा कारची सध्या बाजारात मोठी चर्चा आहे. त्यात प्रामुख्याने टेस्ला, फोर्ड आणि ॲपलसारख्या कंपन्यांच्या नावांचा समावेश होतो. पण या गाड्यांबाबतचा सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे, सेल्फ ड्रायव्हिंगवेळी अपघात झाल्यास जबाबदार कोण - कार कंपनी की चालक? चला, तर मग जाणून घेऊया....
ऑटोनॉमस किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार
अशा कार चालवण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही. यासाठी अशा गाड्यांमध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर असतात. या सेन्सर्सद्वारे मिळणारी माहिती केबिनमधील कॉम्प्युटर डिस्प्ले, पॉवरट्रेन व कॅमेऱ्यांना दिली जाते.
अपघात झाल्यास कोणाला शिक्षा?
- ऑटोपायलट मोडमध्ये सर्व नियंत्रण कारच्या एआय सिस्टिमकडे असते, आपात्कालीन परिस्थितीत फक्त ड्रायव्हरला निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- ऑटोपायलट तंत्रज्ञानाला शिक्षा होऊ शकत नाही आणि ड्रायव्हर तर गाडी चालवत नव्हता. अशा परिस्थितीत प्रामुख्याने चालकाला शिक्षा होते. अपघातासाठी ड्रायव्हरला जबाबदार धरले जाते कारण ज्या देशांमध्ये सेल्फ-ड्रायव्हिंग वाहनांना परवानगी आहे, तेथे काही नियम आहेत.
- अशा कारमध्ये ड्रायव्हरने गाडी चालवताना नेहमी स्टेअरिंगवर हात ठेवणे आवश्यक आहे. त्याने नेहमी लक्ष देणेही गरजेचे आहे जेणेकरून तो अपघातसमयी नियंत्रण मिळवू शकेल. यूकेमध्ये अशा अपघातात दोषी आढळलेल्या चालकाला तुरुंगवासही होऊ शकतो, पण त्याचवेळी जर तंत्रज्ञानात दोष असेल तर कार कंपनीविरोधात कोर्टात धाव घेता येते.