इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं...
By नितीन जगताप | Published: November 6, 2022 05:29 AM2022-11-06T05:29:29+5:302022-11-06T05:30:26+5:30
पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढीस लागले. त्यातही लोकांचा कल इलेक्ट्रिक बाइककडे अधिक आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढीस लागले. त्यातही लोकांचा कल इलेक्ट्रिक बाइककडे अधिक आहे. वापरण्यास सोपी आणि पेट्रोल-डिझेलचा खर्च नाही, असे त्यामागचे सोपे गणित. मात्र, जसजसा इलेक्ट्रिक बाइकचा खप वाढू लागला तसतशा त्यातील उणिवांची माहिती उजेडात येऊ लागली. त्यातलीच एक म्हणजे या बाइकना लागणाऱ्या आगी. इलेक्ट्रिक बाइकने पेट घेतल्याच्या बातम्यांची वारंवारता वाढली. का घेत असतील इलेक्ट्रिक बाइक पेट, जाणून घेऊ या...
केंद्रीय समितीचा अहवाल काय सांगतो?
इलेक्ट्रिक दुचाकीला लागणाऱ्या आगीचे कारण शोधण्यासाठी बनवण्यात आलेल्या केंद्रीय समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार बॅटरी डिझाइन आणि मॉड्यूल तसेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या संपूर्ण बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये (बीएमएस) गंभीर समस्या आहे. यामुळे बॅटरी जास्त गरम झाल्याने आग लागते. काही मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंमत कमी करण्यासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरत असल्याचे निरीक्षणही या समितीने नोंदवले आहे.
कोणती बॅटरी सुरक्षित?
लिथियम फॉस्फेट बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती उष्णता सहन करू शकते. तर लिथियम आयर्नमध्ये असे होत नाही. त्यामुळे या बॅटरींना आग लागण्याची शक्यता असते.
का तापतात या बॅटऱ्या?
चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये बहुतांश बॅटऱ्यांचे उत्पादन होते.
इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व बॅटरी प्लास्टिकच्या कॅबिनेटसह असतात.
बॅटरी गरम झाल्यानंतर प्लास्टिक वितळते. यासोबतच त्याला जोडलेले सर्किटही वितळू लागते. यामुळे आगीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
बॅटरी पूर्णपणे बंदिस्त असली तरीही उष्णता बाहेर पडते. जेव्हा बॅटरी गरम होते, तेव्हा स्राव वेगाने तयार होतो.
लिथियम आयर्नच्या बॅटऱ्या अधिक उष्णता सोडतात. त्यामुळे या बॅटऱ्यांऐवजी लिथियम फॉस्फेटच्या बॅटऱ्या वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे.
काय आहेत उपाय?
शेलवरील आवरण मजबूत असावे. ‘हीट सिंक’ वापरायला हवे, परंतु बॅटरी ऑपरेटर सध्या ते वापरत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे स्वॅप करण्यायोग्य बॅटरी. या बॅटरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जातात. अशा स्थितीत बॅटरीमधील ‘हीट सिंक’ वाढल्यास त्याचे वजनही वाढते. त्यामुळे उचलण्यात काही अडचण येऊ शकते. त्यामुळे वजन मुद्दाम हलके ठेवण्यात आले आहे.
ई-बाइकमध्ये कोणत्या बॅटऱ्या वापरल्या जातात?
ई-बाइकमध्ये लिथियम-आयर्न अर्थात लि-आयन (याला लायन असेही संबोधले जाते) या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्येही या बॅटऱ्यांचा वापर केला जातो.
इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत या वजनाने हलक्या आणि अधिक कार्यक्षम असल्याचे मानले जाते.
या बॅटऱ्या चार्जिंगवेळी अधिक तापल्यानेच आतापर्यंतच्या दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी...
गुणवत्तापूर्ण वाहन घ्या
योग्य वेळेत चार्जिंग बंद करा
वातावरण थंड असताना चार्जिंग करा
इलेक्ट्रिक वाहन सावलीत उभे करा
सुसंगत वेगाने वाहन चालवा
नियमित सर्व्हिसिंग करा
गाडी रात्रभर चार्जिंगला ठेवू नका.
गाड्यांना कोण प्रमाणित करते?
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात.