टायरला फुगे का येतात? लक्ष न दिल्यास ऐन वेगात फुटण्याची शक्यता...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 12:11 PM2018-10-04T12:11:46+5:302018-10-04T12:12:29+5:30
कारची सर्वात महत्वाची आणि खर्चिक बाब म्हणजे टायर. कारचे टायर चांगले असल्यास ठीक नाहीतर बऱ्याचदा टायर फुटुन अपघात होतात. यामुळे टायरची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा टायर नवीन असला तरीही त्याला फुगे म्हणजेच टेंगुळ येतात. चला जाणून घेऊया याचे कारण...
कारची सर्वात महत्वाची आणि खर्चिक बाब म्हणजे टायर. कारचे टायर चांगले असल्यास ठीक नाहीतर बऱ्याचदा टायर फुटुन अपघात होतात. यामुळे टायरची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा टायर नवीन असला तरीही त्याला फुगे म्हणजेच टेंगुळ येतात. चला जाणून घेऊया याचे कारण...
टायर हा मुख्यत: रबराचा बनविलेला असतो. मात्र, त्याला एकसंधपणा येण्यासाठी त्या रबरामध्ये तार आणि नायलॉनचे धागेही असतात. आपल्याकडील रस्ते खड्ड्यांनी युक्त असतात. यामुळे खरेतर टायरना फुगे येतात. कारण मोठ्या खड्ड्याची कडा किंवा एखाद्या अनुकुचीदार कडा असलेल्या खांबावरून टायर गेल्यास टायर रिमपर्यंत दाबला जातो. यामुळे हवेचा दाब टायरच्या बाजुच्या भागावर पडतो. तुम्ही म्हणाल टायर फ्लेक्सीबल असतो. मग फुगा कसा येतो....
टायरच्या बाजुच्या कडेवर दाब आल्याने तेथील धागे तुटतात. यामुळे तेथील रबर हवेमुळे फुगतो. यामुळे या ठिकाणी फुगा येतो. असा टायर चालविल्यास फुटण्याची दाट शक्यता असते. हा प्रकार टाळताही येऊ शकतो. मात्र, त्यासाठी आपले ड्रायव्हिंग रॅश असता कामा नये. कारण खड्ड्याच्या कडेवरून टायर जोरात गेल्यास त्यातील धागे तुटू शकतात. मात्र, हळूवार गाडी खड्ड्यावरून नेल्यास ही शक्यता कमी होते.
ऑक्टोबर हिट आणि खड्ड्यांचे दुखणे...
आता ऑक्टोबर हिट सुरु होत आहे. यामुळे रस्तेही तापलेले असतील. पावसाळ्यात पडलेले मोठेच्यामोठे खड्डे अद्याप बुजवले गेले नसतील. यामुळे गाडी सावकाश चालविणे आवश्यक आहे. कारण आधीच घर्षणामुळे टायर तापलेले असतील आणि त्यात त्यांच्यावर दाब पडल्यास फुगे येण्याची शक्यता आहे. यामुळे वेळोवेळी टायर तपासत राहणे गरजेचे आहे. फुगा दिसल्यास तातडीने टायर बदलावा. वॉरंटीमध्ये असल्यास कंपनीला कळवावे.