कारमध्ये Steering Wheel उजव्या बाजूलाच का असते? यामागे रॉकेट सायन्स नाही, तर...! जाणून आश्चर्य वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:17 AM2023-03-04T11:17:43+5:302023-03-04T11:18:57+5:30
...अन् प्रकारे ड्रायव्हरसीट आणि स्टिअरिंग व्हील उजव्या बाजूला ठेवण्यात आले.
भारतातकारच अथवा चारचाकी वाहनांचे स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला देण्यात येते. पण, असेच का? यावर आपण कधी विचार केला? गाडीचे स्टीअरिंग व्हील मध्यभागी अथवा डाव्या बाजूला का दिले जात नाही? खरे तर यामागे कुठल्याही प्रकारचे रॉकेट सायन्स नसून इंग्रज आहेत. हो, हे खरे आहे! सर्वांना माहित आहे की 1947च्या पूर्वी इंग्रजांनी बरेच वर्ष भारतावर राज्य केले. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठीच इंग्रजांनी भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा नियम केला होता. तेव्हा वाहतुकीसाठी घोडागाडी (बग्गी) वापरली जायची. बग्गीचालक गाडीवर समोर तर बसायचे. पण, रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी चालवण्याच्या नियमामुळे बग्गीत समोरच्या बाजूला मधोमध बसणे त्यांना अवघड झाले होते.
खरे तर, बग्गीच्या मधोमध बसल्याने समोरून येणाऱ्या बग्ग्या दिसायला त्यांना त्राय व्हायचा, म्हणून ते उजव्या बाजूला सरकून बसू लागले. यामुळे त्यांना सुरक्षितपणे बग्गी चालवता येत होती. तसेच समोर येणारी बग्गीही ते सहजपणे बघू शकत होते. अर्थात, इंग्रजांनी डाव्या बाजूने चालण्याचा नियम तयार केल्यानेच बग्गी चालकांना उजव्या बाजूला सरकून बसावे लागत. यानंतर बग्गीची जागा कारने घेतली आणि हीच गोष्ट कारमध्येही फॉलो करण्यात आली. जेणे करून ड्रायव्हरला समोर पाहणे सोपे जावे.
अशा प्रकारे ड्रायव्हरसीट आणि स्टिअरिंग व्हील उजव्या बाजूला ठेवण्यात आले. यामुळे कार चालवताना ड्रायव्हरला समोरून येणारी वाहने सहजपणे दिसू शकतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, संपूर्ण जगातच कारला उजव्या बाजूला स्टिअरिंग असते असे नाही. ज्या देशांत रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा नियम आहे. त्या देशांत कारला उजव्या बाजूला स्टीअरिंग दिले जाते.