काय सांगता राव! गवतापासून CNG तयार होणार? महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 50 कोटींचा प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 09:45 AM2021-06-13T09:45:19+5:302021-06-13T09:45:44+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी इथेनाल निर्मितीसाठी पुढाकार घेतला. साखर कारखान्यात इथेनाल निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया तालुक्यातील रायपूर येथे २५ एकर जागेवर जैव इंधन निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करणयात आले आहे.
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलच्या दराने तर शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे महागाईदेखील वाढली आहे. यावर उपाय म्हणून जैविक इंधनाचा पर्याय पुढे येत असून, आता गवतापासून इंधन (सीएनजी) तयार करण्याचा प्रकल्प सुरू होत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी इथेनाल निर्मितीसाठी पुढाकार घेतला. साखर कारखान्यात इथेनाल निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया तालुक्यातील रायपूर येथे २५ एकर जागेवर जैव इंधन निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करणयात आले आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल. गोंदियाचे सुपुत्र व या प्रकल्पाचे संचालक महेंद्र ठाकूर यांची ही कल्पना असून, एकूण ५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. मागील २० वर्षांपासून ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारी गोंदिया येथील रुची बायोकेमिकल्स आणि मुंबईच्या नामवंत मीरा क्लिनफ्यूल कंपनीच्या तांत्रिक व आर्थिक साहाय्याने प्रकल्प उभा राहील. या कंपन्यांत करार झाला आहे.
जर्मन टेक्नॉलॉजीचा होणार वापर
इंधनासाठी गोंदिया तालुक्यातील प्रत्येक गावात गवताची लागवड केली जाणार आहे. शिवाय गाव व शहरातील ओला कचरा, पालापाचोळादेखील इंधन निर्मितीसाठी वापरण्यात येईल. या प्रकल्पात जर्मन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने बायोरिएक्टरमध्ये गॅस निर्मिती होणार आहे. हा गॅस शुद्धीकरणानंतर मोटारबाइक, कार, मालवाहक, ट्रॅक्टर, वाहन चालविण्यासाठी वापरता येऊ शकेल, तसेच घरगुती व औद्योगिक क्षेत्रासाठीही त्याचा वापर करता येईल. भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार होऊन विमानासाठीही इंधन तयार होईल.
प्रकल्पाला गवत पुरविण्याचे काम शेतकरी करणार आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी गठित करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. पारंपरिक धान पिकाला आता फाटा देत नगदी पीक असलेल्या गवताच्या शेतीकडे आता जिल्ह्यातील शेतकरी वळतील.
-महेंद्र ठाकूर, प्रकल्प संचालक