ओला आता तरी सुधारणार का? शोरुम बंद करता करता ते जाळण्यापर्यंत वेळ आली, सर्व्हिसच नाही
By हेमंत बावकर | Published: September 11, 2024 04:39 PM2024-09-11T16:39:31+5:302024-09-11T16:54:47+5:30
Ola Showroom Set on Fire News: आजपर्यंत ओलाच्या शोरुमवर ग्राहक धडका मारत होते. शोरुम बंद करायला लावत होते. आज तर कहरच झाला आहे.
- हेमंत बावकर
साधारण तीन वर्षांपूर्वी सुरु झालेला ओला ईलेक्ट्रीक कंपनीचा प्रवास ग्राहकांच्या शिव्याशाप खाण्यातच झाला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी ओला एस १ प्रोच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली होती. तेव्हा एक-दोन नव्हे तर तब्बल ३०-३५ समस्या या ओलाच्या स्कूटरमध्ये होत्या. आजही तीच परिस्थिती आहे. ग्राहक सेवा केंद्र विचारत नाही, ओलाच्या स्कूटर एकेक दोन दोन महिने नादुरुस्त होऊन सर्व्हिस सेंटरमध्ये तशाच पडून आहेत. आजपर्यंत ओलाच्या शोरुमवर ग्राहक धडका मारत होते. शोरुम बंद करायला लावत होते. आज तर कहरच झाला आहे.
कर्नाटकातील कलबुर्गीमधील शोरुम ओलाच्या वैतागलेल्या ग्राहकाने जाळला आहे. मंगळवारी ही घटना घडलेली आहे, याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. महत्वाची बाब म्हणजे २२ वर्षीय मोहम्मद नदीम हा स्वत: पेशाने मेकॅनिक आहे. त्याने अवघ्या २० दिवसांपूर्वी ओलाची स्कूटर घेतली होती. तिच्या सर्व्हिसिंगवरून नाराज झाल्याने त्याने अनेकदा कस्टमर केअरला फोन केले होते. त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स येत नाही म्हणून अखेर त्याने संतापून ओला स्कूटरला नाही तर अख्ख्या शोरुमलाच आग लावण्याचे पाऊल उचलले. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असली तरी या सर्व घटनांवरून ओलाचा मालक, कंपनी आतातरी सुधारणार आहे का, असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत. ओलाच्या स्कूटरलाही गेल्या वर्षी एका ग्राहकाने आग लावली होती. आता तर शोरुमलाच पेटवून देण्यात आले आहे.
ओला कंपनी ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी फारशी गंभीर नाहीय असे पुण्यातील ओलाच्या शोरुममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून समोर आले होते. ओला कंपनीला केवळ स्कूटरची विक्री वाढवायची होती. ओला कंपनीचा आयपीओ येणार होता, यामुळे फक्त विक्री वाढवा असे आदेश देण्यात आले होते, असे या सूत्रांनी लोकमतला सांगितले होते. ओला कंपनीची बंगळुरूतील बड्या अधिकाऱ्यांची एक टीम काही महिन्यांपूर्वी शोरुमच्या भेटी घेत होती. हा तोच काळ होता जेव्हा कंपनीचे अनेक बडे अधिकारी अचानक राजीनामा देत होते.
ओलाच्या स्कूटरमधील समस्या काही केल्या सुटत नव्हत्या. कोणतीही समस्या असली की ती सोडविण्यासाठी कंपनीची सिस्टिम अॅप्रूव्हल देते. ओलाची स्कूटर ही हायटेक असल्य़ाने ती कशी चालविली, कितीदा चार्ज केली, किती वेळात चार्ज केली आदी अनेक गोष्टी ओलाच्या सर्व्हरला नोंद होतात. यामुळे एखादी समस्या आली की त्याची चौकशी केली जाते. यानंतर वॉरंटी अॅप्रूव्हल येते, असे या कर्मचाऱ्याने सांगितले होते. हा कालावधी मोठा असल्याने ओलाचा ग्राहक वैतागत होते. काहींनी तर शोरुम फोडण्याची, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, मारहाण करण्याची देखील धमकी दिली होती. अशा वातावरणात ओलाचे शोरुममधील कर्मचारी काम करत असताना कर्नाटकातील आग लावण्याचा प्रकार कंपनीसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.
कंपनीचे वकील बघून घेतील...
ओलाचे ग्राहक प्रचंड वैतागलेले होते. यातून अनेक ठिकाणी कायदेशीर लढा देण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली होती. कर्मचाऱ्यांनी या टीमसमोर या गोष्टीही मांडल्या होत्या. परंतू, ही टीम काही केल्या या समस्या ऐकत नव्हती. कोणी ग्राहक न्यायालयात धाव घेतली तर कंपनीचे वकील पाहतील, असे या लोकांना सांगण्यात आले होते.
आता या कंपनीचा आयपीओ येऊन महिना झाला आहे. अनेक फर्म ही कंपनी तोट्यात आहे, त्यांचा तोटा वाढतच चालला आहे असे सांगत आहेत. ओलाचा शेअर १५७ चा आकडा गाठून परत खाली आला आहे. अशातच ओलाचा खपही जबरदस्त वाढला आहे. या सर्व गोष्टींमध्ये ग्राहक मात्र भरडला जात आहे. या समस्या सोडविण्याकडे, चांगली सर्व्हिस देण्याकडे आतातरी ओलाचा मालक भाविष अग्रवाल लक्ष देईल का असाच प्रश्न ओलाच्या ग्राहकांकडून विचारला जात आहे.