कार पुन्हा महागणार? बीएस-६च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:10 AM2022-10-10T06:10:31+5:302022-10-10T06:10:42+5:30
भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुढील वर्षी एप्रिलपासून कठोर उत्सर्जन नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे वाहन निर्माते त्यांची वाहने अपग्रेड करण्यासाठी गुंतवणूक करत असल्याने प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत
आहे. एकदा असे झाले की, उत्सर्जन मानके युरो-६ मानकांच्या बरोबरीने असतील. चारचाकी प्रवासी आणि व्यावसायिक वाहने प्रगत मानकांशी सुसंगत करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत वाहन उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढू शकतो, त्याचा भार अंतिमतः पुढील आर्थिक वर्षापासून खरेदीदारांनाच सोसावा लागेल, असे वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.
कोणत्या भागावर लक्ष?
प्रगत उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्यासाठी, वाहनांना अशा उपकरणासह सुसज्ज करणे आवश्यक आहे. ज्यामुळे चालत्या वाहनाच्या उत्सर्जन पातळीचे परीक्षण शक्य होणार आहे. यासाठी हे उपकरण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सरसारख्या अनेक महत्त्वाच्या भागांवर लक्ष ठेवेल.नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे वाहनांच्या एकूण किमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
नवीन वाहनांमध्ये काय सुविधा?
nवाहन उत्सर्जन पातळी निश्चित केलेल्या मानकांपेक्षा जास्त होताय, हे उपकरण वाहनाची योग्य सर्व्हिस करण्याची वेळ आली, हे सांगण्यासाठी इशारा लाईट देईल.
nयाशिवाय, वाहनामध्ये खर्च होणाऱ्या इंधन स्तराला नियंत्रित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्टर देखील लावण्यात येतील. हे उपकरण पेट्रोल इंजिनला पाठवल्या जाणाऱ्या इंधनाचे प्रमाण आणि वेळेवरही लक्ष ठेवेल.
आणखी बदल काय?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर चिपलाही इंजिनचे तापमान, ज्वलनासाठी पाठवलेला हवेचा दाब व उत्सर्जनातील कण यांचे निरीक्षण करण्यासाठी देखील अपग्रेड करणे आवश्यक आहे.
वाहन कंपन्या काय म्हणतात?
टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, कंपनी या परिवर्तनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि अभियांत्रिकी क्षमतेचा मोठा हिस्सा या विकासकामात गुंतला आहे.
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी अधिकारी (कॉर्पोरेट अफेअर्स) राहुल भारती म्हणाले की, कंपनी बीएस - ६च्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील तयारी करत आहे.
कंपनीची सर्व वाहने बीएस - ६ची दुसऱ्या टप्प्यातील मानकांनुसार केली जातील. त्यासाठी इंजिनची क्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल, असे प्रमुख वाहन उत्पादक महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (ऑटोमोटिव्ह सेक्टर) विजय नाकरा यांनी म्हटले आहे.
२०२०
१ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन मानक म्हणून भारतात बीएस-६ चा पहिला टप्पा लागू करण्यात आला होता.
७०
हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
वाहन कंपन्यांना
नवीन
मानकांशी जुळवून घेण्यासाठी करावी
लागली होती.