वाहनाच्या क्लच विना गीयरचे काम व्यर्थ आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 12:55 PM2017-09-07T12:55:16+5:302017-09-07T12:59:44+5:30
मॅन्युअल गीयर टाकण्याची प्रणाली असलेल्या कार, बस, स्कूटर, मोटारसायकल, ट्रक, टेम्पो, रिक्षा अशा सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये क्लच हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. क्लचमुळे तुम्ही तुमच्या वाहनाच्या गतीसाठी सुयोग्य गीयर टाकू शकता. तो नसता तर गीयर टाकणे अवघड बनले असते
मॅन्युअल गीयर टाकण्याची प्रणाली असलेल्या कार, बस, स्कूटर, मोटारसायकल, ट्रक, टेम्पो, रिक्षा अशा सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये क्लच हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. क्लचमुळे तुम्ही तुमच्या वाहनाच्या गतीसाठी सुयोग्य गीयर टाकू शकता. तो नसता तर गीयर टाकणे अवघड बनले असते. दुचाकी वाहनाला क्लच हा स्टिअरिंग रॉडला डाव्या बाजूला असतो. डाव्या हाताने क्लच कार्यान्वित होण्यासाठी दिलेला लिव्हर दाबून मग गीयर टाकावा व क्लच हळूवार सोडावा, जेणेकरून स्कूटर वा मोटारसायकल पुढे सरकेल.
स्कूटरला क्लचजवळच हाताने फिरवून गीयर टाकण्याची सुविधा असते तर मोटारसायकलीला डाव्या पायाने गीयर टाकावा लागतो. आज स्कूटर ऑटो गीयरच्या झाल्याने नव्या पिढीला हाताने क्लच दाबून हाताने योग्य गीयर टाकण्याची पद्धत अवलंबावी लागत नाही. खरे तर क्लच व गीयर यांचा वापर असा करणे खूप कठीण वाटते पण सवयीने ते जमते इतकेच नाही तर या दोन प्रकारच्या घटकांमुळे दुचाकीचा वेग नियंत्रित करण्या एक सुरक्षित पर्याय मिळतो. गीयर टाकणे ही संकल्पनाच काही वेगळी आहे. तिला एक शिस्त आहे. पण त्यासाठी क्लच अपरिहार्य आहे.
दुचाकीचा विचार करता, हातात असलेला क्लच कसा वापरायचा ते अनुभवण्यासारखे आहे. गीयर व क्लच यांचे एकत्रित काम म्हणजे दोहोंचा ताळमेळ योग्य असावा लागतो. त्यांचे सिंक्रोनायझेशन जमणे आवश्यक आहे. क्लच दाबून गीयर टाकल्याने गीयर टाकण्याची व तो पडल्यानंतर कार्यान्वित होण्याची क्रिया ही स्मूथ होते. क्लचविना गीयर टाकल्यास झटा बसतो व त्यामुळे दुचाकी उडी मारू शकते व बंद पडू शकते, नियंत्रण सुटू शकते. गीयरमध्ये स्कूटर वा मोटारसायकल असताना विनाकारण क्लच दाबणे वा हाफ क्लच ऑपरेट करणे हे चुकीचे आहे. पूर्ण क्लच त्या स्थितीत दाबला तर गीयर कार्य थाबवतो न्यूट्रलसारखी स्थिती तेव्हा येते. अशावेळी उतारावर असाल तर ब्रेकींगही कठीण व धोक्याचे असते. क्लच हा इतका प्रभावी भाग आहे. गीयर बदल व गीयर टाकणे याच कामासाठी त्याचा वापर व्हायला हवा.
अनावश्यक व अयोग्य वापराने क्लचप्लेट खराब होणे, क्लच केबल तुटणे, दुचाकी अनियंत्रित होणे असे प्रकार घडू शकतात. मात्र हाच क्लच दाबून टॉप गीयरमध्ये असणारी दुचाकी नियंत्रित करण्यासाठी गीयर बदलण्यासाठीही ताकदवान ठरतो. तुमच्या दुचाकीचे नियंत्रण गीयर बदलानेही प्रभावी करता येते, पण त्यासाठी क्लच हा दाबावा लागतो व तोच त्या स्थितीत नियंत्रितपणे गीयर लोवर आणण्यासाठी मदत करतो. क्लच व गीयर यांचे सुयोग्य संतुलन अनेक बाबतीत फायदेशीर ठरते. वेग, मायलेज व नियंत्रण यासाठी क्लच उपयुक्तच. बंद गाडी क्लच दाबून ढकलत नेऊन गीयरमध्ये स्टार्ट करण्याचाही प्रकार केला जातो. कठीण प्रसंगी तो उपयुक्त असला तरी ते धोकादायक ठरू शकते. काही असले तरी क्लचविना गीयर व्यर्थ आहे हे लक्षात ठेवा, इतका हा क्लच महत्त्वाचा भाग आहे.