भारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:33 PM2020-01-06T16:33:21+5:302020-01-06T16:34:10+5:30
बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत.
नवी दिल्ली : बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. अशावेळी एकच पर्याय समोर दिसत आहे. तो म्हणजे इलेक्ट्रीक वाहनांचा. सरकारनेही याचा पिच्छा पुरविला आहे. मात्र, सध्याच्या कारच्या किंमती पाहता या कार सामान्यांपासून कोसो दूरच आहेत. पण चीनची सर्वात मोठी कंपनी यंदा भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार उतरवून धमाका करणार आहे.
फेब्रुवरीमध्ये होणाऱ्या Auto Expo मध्ये Great Wall Motors (GWM) ही कंपनी एसयुव्ही कारसोबत जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार म्हणून प्रसिद्ध असलेली Ora R1 दाखविणार आहे. ही कार दिसायला छोटी असली तरीही तिचे कारनामे मोठे आहेत.
साधारण अल्टो किंवा क्विडच्या आकाराची ही कार एका चार्जिंगमध्ये तब्बल 351 किमीचे अंतर तोडणार आहे. तर या कारचा सर्वाधिक वेग 100 किमी प्रती तास असणार आहे. ओरा आर1 मध्ये 35 किलो वॉटची मोटार देण्यात आली आहे. कंपनी ही कार यंदाच लाँच करण्याच्या तयारीत असून तीन वर्ष किंवा 1.20 लाख किमी तसेच 8 वर्षे किंवा 1.5 लाख किमी मोफत सर्व्हिसिंग देण्याची शक्यता आहे.
या कारची किंमत सर्वांना धक्का देणारी आहे. भारतीय बाजारात ही कार 6.23 लाख ते ८ लाख रुपयांमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच यावर सरकारकडून सबसिडीही मिळण्याची शक्यता आहे.
ग्रेट वॉल मोटर्स ORA ब्रँड अंतर्गत तीन इलेक्ट्रीक कार R1, R2 and iQ या विकते. Ora R1 आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचरने लेस असणार आहे. शिवाय कनेक्टिव्हीटी फिचरही दिले जाणार आहे. कारचा मालक ही कार "Hello, Ora" बोलूनही सुरू करू शकणार आहे.