World’s Smallest Car : जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून व्हाल चकित!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 01:00 PM2023-01-27T13:00:36+5:302023-01-27T13:01:23+5:30
World’s Smallest Car : ही कार पील नावाच्या कंपनीने बनवली असून अॅलेक्स ऑर्चिनने डिझाइन केले आहे.
नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्र झपाट्याने वाढत आहे, छोट्या कार्ससोबतच हॅचबॅक आणि एसयूव्ही सेगमेंटमध्येही मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत कारची विक्रीही वाढली आहे. पण कार खरेदी करणार्यांचा एक वर्ग असा आहे की, जो शहरातील प्रवासासाठी छोट्या कारला प्राधान्य देतो. त्यामुळे टाटा नॅनो, बजाज क्यूट आणि पीएमव्ही ईएएस ई सारख्या कारचे उत्पादनही वेगाने होत आहे.
अशा परिस्थितीत, जगातील सर्वात लहान कार कोणती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ती नॅनो किंवा बजाज क्यूट नाही. तर त्या कारचे नाव Peel P50 आहे. या कारची लांबी फक्त 134 सेमी आहे. यामध्ये एकच व्यक्ती बसू शकतो. ही कार पील नावाच्या कंपनीने बनवली असून अॅलेक्स ऑर्चिनने डिझाइन केले आहे.
या कारची रुंदी 98 सेमी आणि उंची 100 सेमी आहे. मोटारसायकलच्या तुलनेत कारचे वजन खूपच कमी असते. कारचे वजन फक्त 59 किलो आहे. या कारच्या आकारामुळे 2010 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात लहान कार म्हणूनही नोंद करण्यात आली होती.
मोपेड पेक्षा कमी पॉवर
पील पी 50 मध्ये मोपेडपेक्षा लहान इंजिन दिले जाते. पण, ते त्यासह चांगले कार्य करते. पीलमध्ये 49 सीसीचे टू स्ट्रोक इंजिन आहे, जे 4.2 बीएचपी पॉवर आणि 5 एनएम टॉर्क जनरेट करते. हे 3 स्पीड मॅन्युअल गियर बॉक्ससह येते. कारचा टॉप स्पीड सुमारे प्रति तास 61 किमी आहे. तर कारचे मायलेज प्रति लिटर 80 किमीपर्यंत आहे.
...म्हणून आहे हलकी
कारची डिझाइन अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तिचे वजन खूपच कमी आहे. कारची बॉडी मोनोकॉक फायबर ग्लासने बनलेली आहे. फीचर्सबद्दल बोलायचे तर दोन पेडल्ससह कंट्रोलिंग व्हील, गियर शिफ्टर आणि स्पीडोमीटर शिवाय दुसरे कोणतेही फीचर नाही.
इलेक्ट्रिक व्हेरिएंटही लाँच
पी 50 चे पहिल्यांदा उत्पादन 1965 मध्ये झाले होते. यानंतर, 2010 मध्ये, ते पुन्हा एकदा तयार केले गेले आणि बाजारात आणले गेले. आता P50 लंडनमध्ये तयार केले जाते. कंपनीने आता या कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंटही लाँच केले आहे. जर या कारच्या किंमतीबद्दल बोललो तर कारची किंमत जवळपास 84 लाख रुपये आहे. कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन E 50 युरोपियन मार्केटमध्ये खूप पसंत केले जाते.