इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Xiaomi ची एंट्री; स्वस्त कार आणून करणार का इतर कंपन्यांची सुट्टी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 01:07 PM2021-09-03T13:07:52+5:302021-09-03T13:09:04+5:30
Xiaomi Electric Car: शाओमीने मार्चमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार बिजनेसची घोषणा बीजिंगमध्ये केली होती. यासाठी कंपनीने आगामी दहा वर्षांमध्ये दहा बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची देखील घोषणा केली आहे.
Xiaomi ची ओळख स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून आहे. स्मार्टफोन सोबतच कंपनी इतर गॅजेट्स देखील सादर करते. परंतु आता लवकरच Xiaomi इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते. शाओमीने चीनमध्ये अधिकृतपणे इलेक्ट्रिक वेहिकल बिजनेसमध्ये रजिस्ट्रेशन केले आहे. शाओमीच्या इलेक्ट्रिक वेहिकल सब्सिडरीचे नाव Xiaomi EV, Inc. आहे आणि या कंपनीची रजिस्टर्ड कॅपिटल 1.55 बिलियन डॉलर आहे, अशी माहिती CNBC ने दिली आहे. सध्या या कंपनीत 300 कर्मचारी आहेत आणि या कंपनीची धुरा शाओमीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ली जून (Lei Jun) यांच्याकडे देण्यात आली आहे.
शाओमीने मार्चमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार बिजनेसची घोषणा बीजिंगमध्ये केली होती. यासाठी कंपनीने आगामी दहा वर्षांमध्ये दहा बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची देखील घोषणा केली आहे. या बिजनेसमध्ये उतरण्याच्या आधी कंपनीने यात खूप संशोधन केले आहे. तसेच टीम बनवणे, ईव्ही प्रोडक्टची व्याख्या ठरवणे आणि इंडस्ट्रीतील बिजनेसेस सोबत भागेदारी करण्याचे काम देखील केले आहे. अजूनतरी शाओमीने कोणतीही इलेक्ट्रिक कार सादर केलेली नाही.
काही दिवसांपूर्वी शाओमीने ऑटोनॉमस ड्रायविंग फर्म Deepmotion ला सुमारे 77.37 मिलियन डॉलरमध्ये विकत घेतेले होते. या डीलचा फायदा शाओमीला त्यांच्या इलेट्रिक कार व्यवसायात खूप मोठा फायदा होऊ शकतो. चीनमध्ये Xiaomi ला Nio, Xpeng, Tesla आणि BYD सारख्या प्रस्थापित इलेक्ट्रिक कार कंपन्यांना टक्कर द्यावी लागेल. त्यानंतरच कंपनी भारतासह जगभरात आपली इलेक्ट्रिक कार सादर करू शकते, अशी चर्चा आहे.