Xiaomi ने मोबाईलसारखीच EV कारची किंमत कमी ठेवली! कॉपीही केली, रेंज देणार ८०० किमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:55 AM2024-03-29T10:55:51+5:302024-03-29T10:56:05+5:30
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने पहिली इलेक्ट्रीक कार Xiaomi SU7 लाँच केली आहे. शाओमीच्या या कारमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजीला जास्त महत्व दिले गेले आहे, असे सीईओ लेई जून यांनी म्हटले आहे.
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने पहिली इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान, फिचर्सयुक्त कार ८०० किमीची रेंज देणार आहे. कंपनीने टेस्लासारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी मोबाईलसारखीच इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी किंमत ठेवून आश्चर्याचा धक्का दिला आहे.
कंपनीने चीनमध्ये या कारची बुकिंग सुरु केली आहे. या कारची किंमत 215,900 युआन ते 299,900 युआन ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनामध्ये या कारची किंमत 25 ते 30 लाख रुपयांमध्ये असणार आहे. या कारचे नाव Xiaomi SU7 ठेवण्यात आले असून ही कार टेस्लाच्या सेदान कारसारखीच आहे. परंतू टेस्लाच्या Tesla Model 3 कारपेक्षा स्वस्त आहे. टेस्लाची कार चीनमध्ये 245,900 युआन पासून सुरुवातीच्या किंमतीमध्ये विकली जाते.
शाओमीने मोबाईल कंपनीप्रमाणेच दुसऱ्या ब्रँडची कॉपी केलेली आहे. ही कार देखील टेस्ला आणि पोर्श कारसारखी दिसते. शाओमीच्या या कारमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजीला जास्त महत्व दिले गेले आहे, असे सीईओ लेई जून यांनी म्हटले आहे.
एसयु ७ ही कार कंपनीचे स्मार्टफोन, हायपरओएससोबत ऑपरेटिंग सिस्टिम शेअर करते. बीजिंग ऑटोमोटिव इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेड या कारचे उत्पादन करत आहे. या कारमध्ये वेगवेगळ्या व्हील साईज पर्याय देण्यात येत आहे. दोन वेगवेगळे व्हेरिअंट असणार आहेत. या कारचे बेस मॉडेलचे वजन 1,980 किलोग्राम आहे. टॉप स्पीड 210 प्रति तास असून ६६८ किमीची रेंज देते.
तर याचे वरचे व्हेरिअंट 2,205 किलो आहे. टॉप स्पीड 265 किमी असून 101kWh ची बॅटरी एका चार्जमध्ये ८०० किमीची रेंज देते. कंपनी या कारचे आणखी एक व्हेरिअंट लाँच करणार असून 150kW ची बॅटरी आणि १५०० किमी रेंजचा दावा करण्यात येत आहे.